रमजानला परवानगी मिळते तर गोकुळ अष्टमी साठी कीर्तन, भजनाला परवानगी का नाही :भाविक वारकरी मंडळ
सोलापूर दि.२८(क.वृ.): वारकरी परंपरेमध्ये गोकुळ अष्टमीला खूप मोठे महत्व असून ती निष्ठेने साजरी केली जाते. वारकरी भाविकांनी चैत्र वारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती, आषाढी वारी हे सर्व उत्सव घरात राहून साजरे केले. महामारी कोरोना मुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. आंदोलन ही केले नाही, सहकार्यच केले.रमजान साजरा करणेसाठी परवानगी मिळते. बकरे कापण्यासाठी मंत्रालयात चर्चा, बैठका होतात. तर गोकुळ अष्टमीचा साधा विचार ही केला जात नाही. त्यासाठी निवेदन देऊन शासनाला जागे करावे लागते. हेच दुर्दैव आहे. गोकुळ अष्टमी हा परंपरेने केला जाणारा उत्सव आहे. प्रत्येक गावात हा कार्यक्रम केला जातो. ही अष्टमी नित्य नेमाने साजरी करणेसाठी लवकरात लवकर निर्णय करून जाहीर करावा.
तसेच सध्या बाजार पेठे सहित सर्व खुले केले आहे. त्यामुळे येणाऱ्या गोकुळ अष्टमीला आठ दिवस सप्ताह, नित्यनेम करणेसाठी गावा गावातील सर्व मंदिर खुले करून कीर्तन,भजन करणेसाठी नियम अटी घालून परवानगी जाहीर करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन ईमेल द्वारे मुख्यमंत्री यांना भाविक वारकरी मंडळ यांचे कडून राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज व सर्व पदाधिकारी यांनी दिले आहे.
0 Comments