Hot Posts

6/recent/ticker-posts

दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन


अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि.२९(क.वृ.):-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता, यशस्वी होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत,  पालकांनीही निराश न होता मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. करिअरची दिशा ठरवून त्यादृष्टीने पाऊल टाकण्याची ही पहिली संधी असते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेश घेताना आवडीची शाखा निवडावी.
पालकांनीही मुलांचा कल ओळखून त्यांच्यावर सक्ती न करता त्यांना आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी प्रोत्साहित करावे, शैक्षणिक प्रगतीबरोबरच कौशल्य विकास, खेळ-व्यायाम, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने यश खेचून आणले पाहिजे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर प्रगतीची दारे बंद होत नाहीत. प्रगतीची दारे खुली करण्याची हिम्मत असली पाहिजे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवतील त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थीही जिद्दीने प्रगती करतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments