स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे सेवा करणाऱ्या महिलांचा सन्मान राष्ट्रवादीने केला
टेंभुर्णी (क.वृ.):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना या महामारीच्या संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे सेवा करणाऱ्या महिलांचा सन्मान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने कन्या प्रशाला टेंभुर्णी (ता माढा) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच प्रमोद कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
जगावर आलेल्या या महामारीच्या संकटात जिवाची पर्वा न करता घरदार विसरून महाराष्ट्राला अभिप्रेत असलेला खरा महाराष्ट्र धर्म जागवत अविरतपणे कोरोनाशी लढा देत देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी केलेले महान कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. काम नव्हे तर कर्तव्य जाणिवेतून महिलांकडून होत असलेले कार्य कोणत्याही व्रता पेक्षा कमी नाही. हे महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही म्हणून असे काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सुप्रिया सुळे यांच्या आदेशानुसार आमदार बबनदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार समारंभ आयोजित केला असल्याचे राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा जयश्री भरगंडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीने कोरोना मध्ये काम केलेल्या महिलांना सन्मानित करण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे सरपंच प्रमोद कुटे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा जयश्री भरगंडे यांनी केले होते. प्रस्ताविक आदर्श शिक्षक भीमराव भरगंडे यांनी केले.
यावेळी पं स सदस्य वैभव कुटे, डॉ.अमित चोपडे, रामभाऊ शिंदे, महेंद्र वाकसे, मुख्याध्यापक सदाशिव पवार, पत्रकार सतिश काळे आदी उपस्थित होते.
कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल यांचा झाला सन्मान
१) आरोग्य विभागाच्या डॉ प्राजक्ता चोपडे,
२) महसूल विभागाच्या सर्कल मनीषा लकडे,
३) इनरव्हील क्लबच्या डॉ रंजिता रैना,
४) अंगणवाडी सेविका मंगल रावळ,
५) अाशा वर्कर्स रेश्मा सुक्रे
यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
0 Comments