Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतक-यांना कर्जाचा पुरेसा आणि योग्‍य वेळेत पुरवठा करावा - जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

शेतक-यांना कर्जाचा पुरेसा आणि योग्‍य वेळेत पुरवठा  करावा 

                                              - जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम




 पुणे : टाळेबंदीमुळे शेतक-यांची अवस्‍था बिकट झालेली असल्‍याने खरीप हंगामासाठी बँकांनी शेतक-यांना कर्जाचा पुरेसा आणि योग्‍य वेळेत पुरवठा करावा, अशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्‍या. जिल्‍हास्‍तरीय बँकर समितीच्‍या बैठकीत ते बोलत होते. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीस जिल्‍हा अग्रणी व्‍यवस्‍थापक आनंद बेडेकर, नाबार्डचे उप महाव्‍यवस्‍थापक नितीन शेळके, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांच्‍यासह इतर बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
 जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, लॉकडाऊनमुळे शेतक-यांना पीक कर्ज देणे खूप महत्‍त्‍वाचे आहे. सर्व संबंधित बँकांनी शेतक-यांच्‍या कर्जपुरवठयाबाबत सकारात्‍मक प्रतिसाद द्यावा. महात्‍मा फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेचा शासनस्‍तरावर नियमित आढावा घेतला जातो. त्‍याबाबतही बँकांनी दक्षता घ्‍यावी. तसेच स्‍वयंरोजगाराच्‍या योजनांनाही बँकांनी कर्जपुरवठा करुन रोजगाराचे प्रमाण वाढेल, यासाठी प्रयत्‍न करावेत. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्‍ह्यातील बँकांनी चांगले काम केल्‍याबद्दल जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी समाधान व्‍यक्‍त केले.
 मुद्रा योजनेमध्‍ये 2019-2020 या आर्थिक वर्षात  पुणे जिल्‍हा राज्‍यात कर्जवाटपात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्‍ह्यातील 2 लक्ष 37 हजार 268 लाथार्थ्‍यांना 22 अब्‍ज 9 कोटी 75 लक्ष रुपये कर्जपुरवठा करण्‍यात आला. याबद्दल जिल्‍हाधिकारी राम यांनी सर्वच बँकांचे अभिनंदन केले.  मुद्रा योजना तसेच स्‍टॅण्‍डअप इंडिया या योजनेतील लाभार्थ्‍यांच्‍या यशोगाथा लोकांपर्यंत गेल्‍या पाहिजेत, त्‍यातून इतरांना स्‍वयंरोजगाराची प्रेरणा मिळेल, असे ते म्‍हणाले. बैठकीत स्‍वयंरोजगाराच्‍या प्रलंबित प्रकरणांचा बँकनिहाय आढावा घेवून बँकांनी ही प्रकरणे  तात्‍काळ मंजूर करावीत,असे निर्देश जिल्‍हाधिकारी राम यांनी दिले.
 कोरोना रुग्‍णांवर उपचार करणा-या डॉक्‍टरांची हॉटेलमध्‍ये सोय करण्‍यात आलेली आहे. सात दिवस रुग्‍णालयांत उपचार करणे आणि त्‍यानंतर सात दिवस क्‍वारंटाईन होणे, अशी त्‍यांची जीवनपध्‍दती आहे. या डॉक्‍टरांची निवासाची सोय हॉटेलमध्‍ये करण्‍यात आलेली आहे. त्‍यांच्‍या निवास आणि भोजन यासाठी खर्च येतो, बँकांनी आपल्‍या सीएसआर मधील निधीतून या खर्चाचा भार उचलावा, असे आवाहनही जिल्‍हाधिकारी राम यांनी केले. 
Reactions

Post a Comment

0 Comments