जिल्ह्यात आणखी सात रूग्णालयात मिळणार महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ
सोलापूर- राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा प्रारंभ केला. सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी या आरोग्य योजनेतून 33 रूग्णालयातून सेवा मिळत होती कोविड-19 च्या साथरोगामुळे आणि इतर आजारांवरील उपचारासाठी यशोधरा हॉस्पिटल, अश्विनी सहकारी रूग्णालय, मोनार्क हॉस्पिटल, मार्कंडेय सहकारी रूग्णालय, धनराज गिरजी हॉस्पिटल (सोलापूर), महिला हॉस्पिटल, मंगळवेढा, जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी रूग्णालयांचा यात समावेश असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.
याबाबत डॉ. ढेले यांनी पुढीलप्रमाणे अधिक माहिती दिली.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधील महत्वाच्या तरतुदी-
नव्याने समाविष्ट करण्यात आलेले लाभार्थी घटक:-
सध्या योजनेमध्ये पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबे, 14 अवर्षणग्रस्त जिल्ह्यामधील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे, नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांची कुटुंबे. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, महिला, अनाथ आश्रमातील मुले, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाच्या निकषानुसार पत्रकार आणि त्यांची कुटुंबे.
वैद्यकीय उपचारांची संख्या
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी 996 आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी 996 उपचारांसह 213 अधिकचे असे एकूण 1209 आजारांवर उपचार समाविष्ट आहेत. सध्याच्या 971 पद्धतीपैकी 116 पद्धती वापर कमी असल्यामुळे वगळण्यात आल्या असून 141 नवीन पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे. काही पद्धतीचे दर वाढले तर काहींचे कमीही केले आहेत.
सर्व लाभार्थ्यांना गुडघे व खुब्याच्या सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा लाभ मिळणार आहे. लहान बालकांमधील कर्करोग व मानसिक आजारांवरील उपचारही होणार असल्याचे डॉ. ढेले यांनी सांगितले.
लाभार्थ्यांना मुबलक व सहजपणे आरोग्यसेवांचा लाभ मिळावा, यासाठी अंगीकृत रूग्णालयांची संख्या 492 वरून एक हजार पर्यंत करण्यात येणार आहे. अंगीकृत रूग्णालयाचे विभाजन सात श्रेणीमध्ये आहे. यात बदल करून एकत्रित योजनेमध्ये मल्टिस्पेशालिटी रूग्णालये आणि सिंगल स्पेशालिटी रूग्णालये अशा दोनच श्रेणी देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. ढेले यांनी दिली.
सीमा भागातील लाभार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळण्यासाठी शेजारील राज्यांमधील रूग्णालयांचेही अंगीकरण करण्यात येणार आहे. राज्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणीही सम प्रमाणात आरोग्य सेवांची उपलब्धता होण्यासाठी प्रत्येक तालुक्यांमध्ये किमान दोन रूग्णालये अंगीकृत करण्यात येणार आहेत.
आदिवासी बहुल तालुके आणि उस्मानाबाद, गडचिरोली, नंदूरबार व वाशिम या जिल्ह्यांमध्ये रूग्णालयांना प्रोत्साहित करून प्राप्त श्रेणीपेक्षा एक वरची श्रेणी एका वर्षासाठी देण्यात येणार आहे, असे श्री. ढेले यांनी सांगितले.
0 Comments