सांगोला नगरपालिकेच्या रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर व डॉक्टरची सुविधा पुरवावी व शववाहिनी खरेदी करावी.
विद्यमान नगरसेवक सतीश सावंत यांची लेखी निवेदनाद्वारे मागणी
सांगोला/प्रतिनिधी :सांगोला नगरपालिकेकडे असणारी रुग्णवाहिका हि सुसज्य नसून या रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर व डॉक्टर यांची सुविधा उपलब्ध नसल्याने अति गंभीर रुग्णांसाठी नागरपालिकेची रुग्णवाहिका बोलाविणे हे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे सांगोला शहरातील आजारी पडणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता नगरपालिकेने रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर व डॉक्टर यांची सुविधा पुरवावी. तसेच शहरातील मिरज रोड व महूद रोड परिसरातील एखादा नागरिक मृत पावल्यावर लोकांची व प्रेताची होत असलेली असुविधा लक्षात घेता नगरपालिकेने स्वतःची शववाहिका खरेदी करावी या दोन महत्वपूर्ण मागण्यांसाठी सांगोला नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सतीश सावंत यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सद्यस्थितीत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने सोलापूर जिल्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी देखील रोज चढता क्रम घेत आहे. सध्या सांगोला शहर जरी कोरोनमुक्त असले तरी शहरातील नागरिकांचा इतर तालुका व जिल्ह्यांशी संपर्क हा होतच असतो. विविध वस्तू व अन्नधान्यांच्या माल गाड्या असोत अथवा डाळिंब व्यवसाय असो सांगोला शहरातील नागरिकांचा इतर नागरिकांशी संपर्क होत असल्याने सांगोला नगरपालिकेने देखील कोरोनासंदर्भात उपाययोजना करणे आवश्यक आहे..
सांगोला नगरपालिकेकडे स्वतःची रुग्णवाहिका गाडी आहे परंतु या गाडीमध्ये सुसज्य अशी सुविधा उपलब्ध नसल्याने या रुग्णवाहिकामध्ये अति गंभीर रुग्णांसाठी वेंटिलेटरची सुविधा नाही. तसेच रुग्णवाहिकेमध्ये कायमस्वरूपी डॉक्टरांची देखील नेमणूक केलेली नसल्याने अतिशय गंभीर रुग्ण रुग्णवाहिकेमधील सुविधे अभावी दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सांगोला शहरातील मिरज रोड व महूद रोड या परिसरातील एखादी व्यक्ती जर मृत झाली तर सदरचे प्रेत नगरपालिकेच्या वाढेगाव नाका येथील स्मशानभूमीमध्ये घेऊन येणे हे संबंधित नागरिकांसाठी मोठे त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे मृत नागरिकांना वाहून नेण्यासाठी सांगोला नगरपालिकेने शववाहिका खरेदीसाठी सर्वसाधारण सभेत ठराव करून तब्ब्ल 2 वर्षे उलटली तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही कली जात नाही. सांगोला नगरपालिका महाराष्ट्रात सर्वात मोठी ‘क’ वर्ग नगरपालिका आहे. सर्वात मोठे 68.2 चौ.कि.मी. नगरपालिकेचे क्षेत्रफळ आहे. शहरात एखतपूर रोड, मिरज रोड, वासुद रोड, कडलास रोड, महुद रोड, चिंचोली रोड, पंढरपूर रोड, येथे एखादी व्यक्ती मयत झाल्यावर त्याला स्मशानभूमीत आणण्यासाठी त्या-त्या भागात स्मशानभूमी नसल्याने खूप त्रास होत आहे. त्यामुळे शववाहिका खरेदी करणे गरजेचे आहे.
सदरची गरज लक्षात घेऊन नगरसेवक सतीश सावंत यांनी शववाहिका व अॅम्ब्युलन्सला व्हेंटीलेटर बसविण्याबाबत ठराव मंजूर असूनही प्रत्यक्षात अमलात येत नसल्याने वारंवार पठापुराव केला असता प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ व्हेंटिलेटर बसवून रुग्णवाहिकेमध्ये कायमस्वरूपी डॉक्टरची नेमणूक करावी जेणेकरून नागरपालिकेची रुग्णवाहिका ही जीवघेणी न ठरता जीवनदायी ठरावी. तसेच मृतदेह वाहून नेण्यासाठी शववाहिका खरेदी करावी या दोन महत्वपूर्ण मागण्या लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत.
0 Comments