संस्थात्मक अलगीकरणावर भर द्या
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीत सूचना
सोलापूर,दि.२७(क.वृ.): सोलापूर शहरात काटेकोर सर्व्हेक्षण करुन कोरोना बाधा झाल्याची शंका असणाऱ्या आणि कोमॉर्बिड नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन) करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिल्या.
सोलापूर शहरातील कोरोना प्रसार थांबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत श्री.टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत व्यासपीठावर गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सर्वश्री संजय शिंदे, यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ उपस्थित होते.
श्री.राजेश टोपे यांनी सांगितले की, नागपूर, मालेगाव, धारावी येथे संस्थात्मक अलगीकरण केल्यामुळेच तेथील कोरोना प्रसाराचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील दाट वस्ती असलेल्या भागातील सर्व्हेक्षण करा, सर्व्हेक्षणात संशयित वाटणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करा. इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये त्या नागरिकांना चांगला आहार द्या. तेथील वातावरण प्रसन्न ठेवा, त्यांचे समुपदेशन करा.
सर्व्हेसाठी आवश्यक असणारी साधन सामग्री तत्काळ द्या. प्रत्येक आशा वर्करला पल्स ऑक्सिमीटर द्या. पल्स ऑक्सिमीटरचा प्रभावीपणे वापर करा. सर्व्हेक्षण करताना पोलिसांची मदत घ्या. रेशनकार्ड मतदार यादी यांच्या डाटावरुन 50 वर्षांवरील लोकांना ओळखून त्यांच्या चाचण्या घ्या, यासाठी मोबाईल एक्सरे टेलीरेडिओलॉजी तंत्रज्ञानाचा वापर करा. मुंबईतील टास्क फोर्सशी चर्चा करा, अशा सूचना श्री.टोपे यांनी दिल्या.
महानगरपालिकेला आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ यांची उपलब्धता करुन दिली जाईल. मात्र क्वारंटाईन सेंटरची संख्या वाढवा, त्याचबरोबर कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर आणि कोव्हीड हॉस्पिटल यांची क्षमता वाढवा, अशा सूचना श्री.टोपे यांनी दिल्या. पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या एलिझाबेस्ड ॲन्टीबॉडी टेस्ट करुन घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
कोरोनाचे अहवाल तयार करताना त्याचे रिपोर्टींग करताना योग्य काळजी घ्यावी. रिपोर्टीग अचूक होण्यासाठी नियमावलीचे काटेकोर पालन करा, असे श्री.टोपे यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस दल यांनी कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांच्या हालचाली नियंत्रित राहतील यावर लक्ष द्यावे. पोलीस कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी. 55 वर्षावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यालयीन काम द्यावे.
या बैठकीला सिव्हील हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.मंजिरी कुलकर्णी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, हेमंत निकम, ज्योती पाटील, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.मोहन शेगर आदी अधिकारी उपस्थित होते.
0 Comments