अकलूजमध्ये फळे व भाजीपाला विक्रेत्यांसाठी ३०० गाळ्यांची उभारणी
अकलूज (प्रतिनिधी): रस्त्याच्या कडेला व कोठेही अस्ताव्यस्त बसून भाजी विकणार्यांची व ग्राहकांची अडचण व कोरोनाचा धोका लक्षात घेऊन अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे यासाठी प्रशस्त ठिकाणी ३०० गाळ्यांची उभारणी करून फळे व भाजी विक्रेत्यांना सर्व सोयीयुक्त उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
देशात व राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असला तरी अकलूज व परिसरात मात्र याला आळा बसल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बरे झालेले २ रूग्ण व पॉझीटीव्ह आलेले २ रूग्ण यांचा अपवाद वगळता कोरोनाचा आटोक्यात असल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रांतअधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य विभाग व पोलिस यांच्या सहकार्याने आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवामृतचे चेअरमन धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी राबविलेल्या विविध उपाययोजना उपयुक्त ठरताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून फळे व भाजीपाला विक्रेत्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्याचे निवारण करण्यासाठी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी जागेचा शोध घेतला. पोलिस व प्रशासनाच्या संमतीने उदयरत्न टाऊनशिपच्या पाठीमागे असलेली प्रशस्त जागा फळे व भाजी विक्रेत्यांना देण्यासंदर्भात एकमत करण्यात आले. त्यानुसार येथे ३०० शेडनेटच्या गाळ्यांचे नियोजन झाले. येथील जमीन काळ्या मातीची असल्याने पावसामुळे चिखल होणार हे लक्षात घेऊन सुमारे १८७ टिपर मुरूम टाकून ते हावार करण्यात आले. सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळत गाळ्यांची उभारणी करून ग्राहक व विक्रेत्यांच्या सोयीसाठी पिण्याची पाण्याची सोय केली आहे. शिवाय हात धुण्यासाठी सॅनीटायझर, डेटॉल, पाण्याची टाकीचीही उभारणी करण्यात आली आहे.
अकलूज ग्रामपंचायतीने करून दिलेल्या या सुविधेचे विक्रेत्यांनी स्वागत केले असून काल चिठठ्या टाकून ३०० पैकी ३०० गाळ्यांचे मोफत वितरण सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्कल चंद्रकांत भोसले, एपीआय यमगर उपस्थित होते.
0 Comments