कैलास चव्हाण यांच्या 5 एकरातील पपई झाडांवरच पिकू लागल्याने लाखोंचे नुकसान
लॉकडाऊनमुळे व्यापारी खरेदीसाठी फिरकले नसल्याने बसला मोठा फटका
माढा (क.वृ.) :- माढा तालुक्यातील उपळाई खुर्दचे शेतकरी कैलास चव्हाण यांनी लाखों रुपये खर्चून विठ्ठलवाडी ते माढा रोडजवळील 5 एकर क्षेत्रात 4400 पपईची झाडे जोपासली पण ऐन विक्रीच्या भरात भयंकर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे सोलापूर,कोल्हापूर,पुणे,मुंबई व वाशी येथील बाजारपेठा बंद असल्याने मोठे व्यापारी खरेदीसाठी फिरकलेच नाहीत.त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या व अहोरात्र काबाडकष्ट करून वाढविलेल्या पपई झाडांवरच पिकून शेतातच गळून पडू लागल्याने लाखों रुपयांचे नुकसान होतानाचे विदारक दृश्य पहायला मिळत आहे.
कोरोनाच्या भयंकर आपत्तीमुळे शेतकरी अक्षरशः भरडला गेला आहे.मोठ्या अपेक्षेने वाढवलेली पिके व फळबागांना निर्धारित वेळेत ग्राहक व व्यापारी उपलब्ध न झाल्याने माल शेतातच पडून खराब झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कैलास चव्हाण यांनी पपईची लागवड व संगोपन करताना मशागत,गावखत,इतर सेंद्रिय व रासायनिक खते,महागड्या औषधांची फवारणी करण्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च केले होते तसेच नर्सरीमधून प्रत्येक कलमी रोप 12 रुपये प्रमाणे विकत घेतले होते. पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी लाखों रुपये खर्चून सीना नदीवरून पाईपलाइन केली तसेच पाणी साठवण्यासाठी शेततळे करून ठिबक सिंचनही केले.एवढे सगळे करून पपईची झाडे व फळे उत्तमरित्या वाढवली परंतु ऐन विक्रीच्या वेळी बाजारपेठा बंद असल्यामुळे ग्राहक व व्यापारी उपलब्ध झाले नाहीत.दरवर्षी रमजानच्या महिन्यात पपईला मोठी मागणी असते या दृष्टीने नियोजन केले होते परंतु कोरोनामुळे नियोजन फेल गेले व पदरी घोर निराशा आली.अशा भयंकर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करुन शासनाने दिलासा दिला तरच भविष्यात पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करतील अन्यथा कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाहीत.
0 Comments