Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला शहरातील दक्षता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नगरसेवकांसह नागरिकांचा कडाडून विरोध

सांगोला शहरातील दक्षता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नगरसेवकांसह नागरिकांचा कडाडून विरोध


 सांगोला (जगन्नाथ साठे) ;  सांगोला शहरातील दक्षता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल हे कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी  शासन ताब्यात घेणार असल्याची शहरात सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे,मुळातच दक्षता हॉस्पिटल लोकवस्तीत असल्याकारणाने सांगोला नगरपालिकेच्या दमदार  नगरसेवकासह त्या प्रभागातील व शहरातील नागरिकांनी तसेच सामाजिक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. वास्तविक पाहता सांगोला शहरांमध्ये दक्षता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल हे नामवंत हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध आहे.
        या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, मधुमेह, विषबाधा, सर्पदंश, हार्टअटॅक, किडनी विकार, दमा, तसेच इतर आजारांवर प्रभावी व चांगल्या प्रकारे  24 तास सेवा दिली जाते.या हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे.त्यामुळे कोरोना शिवाय इतर आजारावर येथे चांगल्या प्रकारे उपचार केले जातात. येथे कोविड उपचार केंद्र सुरू केले तर इतर आजार असणाऱ्या रुग्णांची गैरसोय आणि हेळसांड होणार आहे. तसेच हे हॉस्पिटल  मानवी वस्तीत व गजबजलेल्या ठिकाणी असल्यामुळे लोकांचा व नगरसेवकांचा कडाडून विरोध आहे. दक्षता हॉस्पिटलला स्वतंत्र कंपाउंड नाही, रुग्णवाहिका व इतर वाहने स्थानिकांच्या घरासमोरच उभी करावी लागतात.त्यामुळे वृद्ध व लहान मुले तसेच आजारी नागरिक,  गरोदर महिला यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे शहरातील दक्षता हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने घेऊ नये,अशा आशयाचे निवेदन नगरसेवकांसह नागरिकांनी मुख्याधिकारी  सांगोला यांना दिले आहे .
      दक्षता हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णालय सुरु करण्यास नगरसेवकासह सांगोला शहरातील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. त्याच प्रमाणे प्रशासनाचा हेतू कितीही चांगला असला तरी  लोकवस्तीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार हे स्थानिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक व भीतीदायक आहे. हे हॉस्पिटल निवडले तर परिसरातील लोकांसाठी कायमचा कर्फ्यू लागू होईल, अशी भीती ही नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे .कोविड उपचार केंद्र शहराच्या बाहेर कोणत्याही शैक्षणिक संस्थेत चालू करावे,अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments