आ. देशमुख यांनी साधला कॉल कॉन्फरन्सद्वारे शिक्षकांशी संवाद
सोलापुर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 350 शिक्षकांशी कॉन्फरन्स कॉल वर संवाद साधत जिल्ह्यातील शिक्षण परिस्थितीचा आढावा आणि मार्गदर्शन घेतले. यावेळी शिक्षकांनी गरीब मुलांना अन्नधान्य पोहोच करण्यासाठी पास उपलब्ध करून द्यावेत, मागणी करत कोरोनाच्या लढ्यात सहकार्य लाभल्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले.
आमदार सुभाष देशमुख यांनी सर्व शिक्षकांशी संवाद साधत शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सर्व शिक्षकांनी शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन अभ्यासक्रम शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. व्हाट्सअप ग्रुप द्वारे मुलांना शिकवले जात असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले तर ग्रामीण भागातील शिक्षकांनी गरीब मुलांना अद्यापही अन्नधान्य मिळालेले नाही, आम्ही त्यांना मदत करण्यास तयार आहोत मात्र पास नसल्यामुळे अडचण येत आहे, त्यामुळे पासची व्यवस्था करावी अशी मागणी केली. यावेळी काही शिक्षकांनी आपल्या परिसरातील माहिती सांगत रेशन दुकानावर तांदूळ मिळत नसल्याने अनेक कुटुंबांचे हाल होत असल्याचे सांगत यात आ. देशमुख यांनी लक्ष घालून सर्वांना अन्नधान्य मिळवून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. दहावी आणि बारावीच्या शिक्षकांनी पेपर तपासलेले आहेत ती उत्तर पत्रिका कशी पोहोच करावी अशी शंका उपस्थित केली. अनेक शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कुटुंबांना साहित्य वाटप केले विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप केल्याचे सांगत शासनाची परवानगी असल्यास आम्हीही कोरोना च्या लढाईसाठी तयार आहोत असे सांगितले. सोलापुरातील शिक्षक जितेंद्र पवार यांनी शिक्षकांना विमा कवच मिळावे अशी मागणी केली.
शिक्षक हे गुरुवर्य असल्याने मार्गदर्शन घेतले: आ. देशमुख
समाजातील प्रत्येक घटकांशी संवाद साधत कोरोनाबाबत सद्यस्थिती आणि माहिती घेत आहे. शिक्षक हे गुरुवर्य असल्यामुळे त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे. शिक्षकांनी चांगल्या सूचना आणि मार्गदर्शन केलेले आहे. शिक्षकांनी सांगितलेल्या अडचणी निश्चित सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन आ. सुभाष देशमुख यांनी दिले.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य द्यावे
सध्या शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासाला प्राधान्य द्यावे. भालभारतीने लिंक दिलेल्या आहेत त्या डाऊनलोड करून अभ्यास करावा असे प्राध्यापक बिराजदार यांनी सांगितले.
0 Comments