नायब तहसिलदार किशोर बडवे यांनी केली अचानक सांगोला शहरातील रेशन दुकानांची पाहणी
सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्याची केली चांगलीच कानउघडणी
सांगोला (जगन्नाथ साठे) सांगोला शहरातील अनेकांची भूक भागविणाऱ्या शासन मान्य स्वस्त धान्य दुकानाला कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार किशोर बडवे यांनी अचानक भेट देऊन रेशन दुकानांची पाहणी केली. यावेळी सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांची बडवे यांनी चांगलीच कानउघडणी केली.दुकानासमोर धान्य घेण्यासाठी आलेल्या लोकांच्या रांगा कमी करण्यासाठी दुकानदारांना योग्य त्या सूचना केल्या. सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी ग्राहकांनी आखून दिलेल्या चौकौनात थांबावे अशी विनंती करून,मास्क आणि सॅनिटायझर असेल तरच रेशन धान्य द्या,अन्यथा देवू नका असा सज्जड वजा दम ही या वेळी दुकानदारांना दिला.उन्हापासून ग्राहकांचा बचाव करण्यासाठी दुकानासमोर मंडप किंवा निवारा शेड उभे करण्याच्या सूचना दुकानदारांना केल्या.
प्रधानमंत्री गरीब कुटुंब कल्याण योजनेंतर्गत सांगोला शहर आणि तालुक्यातील प्रत्येक रेशन दुकानातून अंत्योदय, अन्नसुरक्षा,आणि प्रधान गट रेशन कार्ड असणाऱ्या व्यक्तीला प्रति मानसी पाच किलो तांदूळ मोफत दिला जात आहे, या धर्तीवर सर्वत्र या मालाचे वितरण नियमानुसार होते की नाही, हे पाहण्यासाठी सांगोला शहरातील वज्राबाद पेठेतील विणकर सोसायटी,क्षत्रिय माळी विकास सोसायटी,ग्रामोद्योग तेल उद्योग सोसायटी,बुरुड गल्ली येथील शिवपार्वती सोसायटी,प्रियदर्शनी सोयायटी आदी रेशन दुकानांची नायब तहसिलदार किशोर बडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीअचानक तपासणी करून आवक,जावक रजिस्टर,स्टॉक रजिस्टर,व्हिजिट रजिस्टर, आदि रजिस्टर ची तपासणी करून, दुकानदारांकडून ग्राहकांना नियमानुसार माल दिला जातो की नाही, हे सुद्धा प्रत्यक्ष पाहिले.यावेळी उपस्थित ग्राहकांनी ही आपल्या अडचणी सांगितल्या असता,बडवे यांनी लगेच त्या सोडविल्या.
सांगोला शहर आणि तालुक्यातील रेशन दुकानांच्या अहवालानुसार सांगोला तालुक्यात एप्रिल महिन्यांचे १०० % धान्य वाटप झाले असल्याचे बडवे यांनी सांगितले. रेशन दुकानांच्या किंवा अन्य कोणत्याही अडचणी असतील तर नागरिकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसिलदार योगेश खरमाटे, नायब तहसिलदार किशोर बडवे यांनी केले आहे. या अचानक तपासणी करतेवेळी त्यांच्या सोबत पुरवठा अधिकारी जाधव,अभिलेख पाल देवकर,शिपाई कुंभार उपस्थित होते.
0 Comments