नऊ वाहनांसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची जिल्ह्यांत तपासणी मोहिम
सोलापूर दि. 9 : लॉकडाउनच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात आलेल्या कारवाईत 39 लाख 22 हजार 253 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये नऊ वाहने आणि विदेशी दारु हातभट्टीची दारु आदीचा समावेश आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक रवींद्र आवळे यांनी ही माहिती दिली.
लॉकडाउन लागू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 24 मार्च 2020 पासून या कारवाईला सुरवात केली आहे. आज मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथे MH14 CP 469 या क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून 88 बल्क लिटर देशी मद्याचे वाहतूक करत असल्याचे तपासणीत आढळले. सदरचे वाहन आणि देशी मद्य असा 75 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान सोलापूर ते पाकणी उड्डाण पुलाखालील रस्त्यावर बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणारी मोटार क्रमांक MH44 B1830 जप्त करण्यात आली. यावेळी आकाश गणेश कांबळे आणि भीमराव सुखदेव इंगळे या दोघांना अटक करण्यात आली. वाहनचालक राहूल नागनाथ लोकरे यास अटक करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक डी. डी. लोकरे, के. बी. बिरादार, पी. बी. गोनारकर यांनी केली.
अवैध मद्य वाहतुकीबाबत
तक्रार नोंदविण्याचे आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे लॉकडाउन कालावधीत अवैध मद्य विक्री रोखण्याकरीता 18008333333 हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे. त्याचबरोबर 8422001133 हा व्हॉटस्ॲप क्रमांक सुरु करण्यात आला आहे. नागरिक अवैध मद्य निर्मिती, वाहतूक याबाबत या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात, असे अधिक्षक रवींद्र आवळे यांनी कळविले आहे.
0 Comments