अलिबाग येथे प्राथमिक शिक्षक महासंघाचे १३ मार्च रोजी महाअधिवेशन
प्राथमिक शिक्षक महासंघाची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व महाअधिवेशन १३मार्च रोजी नागोठणे जि रायगड (अलिबाग) येथे आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे. नागोठणे[आलीबाग] जि.रायगड येथील रिलायन्स कंपनीच्या फुटबाँल मैदानावर १३ मार्च रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या महाअधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील , ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ ,शालेय शिक्षणमंत्री ना.वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, उद्योग राज्यमंत्री कु.अदिती तटकरे, शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चू कडू, नगरविकास मंत्री ना.प्राजक्त तनपुरे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या महाअधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे, बदली धोरणात दुरुस्ती करणे, नगरपालिका महानगर पालिकेतील शिक्षकांच्या वेतनासाठी १०० टक्के आर्थिक तरतूद करणे, वस्तीशाळेतून शिक्षकांचा दर्जा मिळालेल्या निदेशकांची मुळ सेवा, सेवा जेष्ठते साठी ग्राह्य धरणे, मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करणे, वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांना कँशलेस सुविधा उपलब्ध करणे, शिक्षण सेवक पद्धत बंद करणे किंवा त्यांचे मानधन वाढविणे, प्राथमिक शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्याना गणवेश मोफत देणे, केंद्र प्रमुखाची १०० टक्के पदे पदोन्नतीने भरणे, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुरुस्त करून खंड २ प्रसिद्ध करणे. नगर पालिका, महानगर पालिकेतील शाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करणे, शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी राज्य रोष्टर बनविणे, शिक्षकांना इतर कर्मचारी यांच्या प्रमाणे १०,२०,३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे, प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना फी सवलत योजना लागू करणे, सर्व प्राथमिक पदवीधर शिक्षकांना पदवीधरांची वेतनश्रेणी देणे, खाजगी शाळेतील शिक्षकाप्रमाणे जि प, न. प. शाळेतील शिक्षकांना रजा रोखीकरणाचा लाभ देणे या प्रमुख मागण्या मांडणात येणार आहेत.
या महाअधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्या राज्यातील शिक्षकांना ९ मार्च ते १४ मार्च या कालावधीची राज्य शासनाने दि. ४ मार्च २०२० च्या पत्रान्वये विशेष रजा मंजूर केलेली असून राज्यातील शिक्षकांनी लाखोंच्या संखेने उपस्थित रहावे अस आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मोहन भोसले, राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, राष्ट्रीय सरचिटणीस बाळासाहेब झावरे, राज्य सरचिटणीस अप्पासाहेब कुल, एन वाय पाटील, विनोद राऊत, जनार्धन निऊंगरमहाराष्ट्र श्रीम.अनुराधा तकटे यांनी केले आहे.
0 Comments