वादळी वाऱ्याचा तडाखा:अडीच एकर द्राक्ष बाग भुईसपाट,काढणीला आलेली द्राक्ष बाग कोसळून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव परिसरात मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी संद्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे सावरगाव येथील विश्वनाथ किसन तोडकरी यांची काढणीला आलेली अडीच एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली. यामध्ये तोडकरी यांचे पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी केली जात आहे.
मागील आठवड्यात याच गावातील एका शेतकऱ्याची द्राक्षबाग वादळी वाऱ्यात आडवी झाली होती. हाडाची काड अन रक्ताचं पाणी करुन सांभाळलेली पिके निसर्गाच्या लहरीपणामुळे डोळ्या देखत वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारात गट नंबर 307 मध्ये तोडकरी यांनी पाच एकर द्राक्ष बागेची लागवड केली होती. यापैकी काढणीला आलेली अडीच एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. सावरगावसह तामलवाडी परिसरात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामध्ये द्राक्षबागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून ज्वारीस सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवल्याने शेतकरी हळहळ व्यक्त करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच कृषी मंडळ अधिकारी श्री.आनंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
0 Comments