शिक्षकाने वाचविला चार जणांचा प्राण....
आटपाडी (प्रतिनिधी)-आटपाडी तालुक्यातील दिघंची- पंढरपूर रोडवर सोलापूर जिल्हा हद्द नजीक उंबरगाव जवळ आज सकाळी साडेअकरा वाजता चार चाकीगाडी व दोन चाकि गाडी यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघाता मधील चारही जणांना यशस्वीरित्या अपघात ग्रस्त घटना स्थळावरून उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यापर्यंत चे काम आटपाडी मधील श्रीराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांनी केले. त्यांच्या धाडसी कार्यामुळे चार जणांचे प्राण वाचले गेले. त्यामुळे जखमींच्या नातेवाईकां कडून प्रा.डॉ. नाईकनवरे यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.याबद्दलची सविस्तर माहिती अशी की, सकाळच्या साडेअकराच्या सुमारास डॉ. नाईकनवरे हे आटपाडी वरून महुदला जात होते .उंबरगाव च्या जवळ ते गेले असता, एक चार चाकी गाडी भरधाव वेगाने त्यांना क्रॉस करून पुढे गेली. आणि पुढे पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रिपल सीट दोन चाकी गाडीला त्यांनी जोरदार पाठीमागून धडक दिली. त्यावेळेस नाईकनवरे हे त्यांच्या पाठीमागे जवळच शंभर ते दोनशे मीटर अंतरावर होते .हा अपघात इतका भीषण होता की, गाडीवरील तिन्ही युवक भररस्त्यावर गंभीररीत्या जखमी होऊन बेशुद्धावस्थेत पडले गेले. आणि चार चाकी गाडी मधील इयत्ता दुसरी मध्ये शिकत असणारी आठ वर्षाची मुलगी (सोनू) तिच्या डोक्यामध्ये जबर मार बसून गंभीररीत्या जखमी झाली. त्यामुळे तीही कोमात जाऊन बेशुद्धावस्थेत पडली. टू व्हीलर वरील तिघेही युवक निंबवडे येथील (बुधावले) होते. या तिघांपैकी एकाची प्रकृती खूपच चिंताजनक होती. हा सर्व प्रकार नाईकनवरे यांच्या समोरच घडला असल्यामुळे त्यांनी आपली गाडी काही क्षणात रोडच्या एका बाजूला उभी करून त्या तिन्ही युवकांना उचलून एका बाजूला ठेवले .आणि चार चाकी मधील ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगायला गेले असता त्या गाडीमधील लहान मुलीची अवस्था खूप गंभीर रित्या जखमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत आजूबाजूचे काही लोक जमा झाले. रोड वरून येणाऱ्या अनेक चारचाकी वाहनांना डॉ. नाईकनवरे यांनी या जखमी चार व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी अनेक वेळा विनंती केली. पण कोणीही जबाबदारी घेऊन उपचारासाठी घेऊन जाण्यास तयार होत नव्हते. डॉ. नाईक नवरे यांनी तीन युवकांची विचारपूस केल्यानंतर ते निंबवडे येथील रहिवासीआहेत असे लक्षात येताच त्यांनी निंबवडे मधील काही व्यक्तींना फोन करून या गोष्टींची माहिती दिली. आणि आटपाडी तालुका पोलिस स्टेशन मधील पी. आय .कांबळे साहेब आणि गुप्तचर विभागाचे पवार साहेब (माऊली )या संबंधाची सविस्तर माहिती देऊन जखमी युवकांचे आणि गाडीचे फोटो त्यांनी त्यांच्या मोबाईलवर पाठवले. तोपर्यंत अनेक लोक ही जमा झाले होते. एका गाडीमध्ये सर्व जखमीं युवकांना बसवून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना पाठवले. त्यानंतर लहान मुलीला म्हसवड येथे उपचारासाठी पाठवून दिले. या सर्व घटना प्रसंगांमध्ये उपचारासाठी या गंभीर जखमींना दवाखान्यामध्ये घेऊन जाण्याची कोणीही जबाबदारी घेत नव्हते .व त्यांच्या जवळ थांबत ही नव्हते. हे पाहून या नव्या बदलत्या काळात माणुसकीचा झरा खरंच आटत चालला आहे की काय..? असं क्षणभर नाईकनवरे यांना वाटून गेलं. पण काही असो... शिक्षकच अनेक नव्या पिढ्या घडवत असतो. समाजाला दिशा देत असतो. आणि समाजामध्ये मानवी मूल्यांची रुजवणूक करत असतो. त्यामुळे उच्चशिक्षित असणाऱ्या प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांनी त्यांच्यावर असणाऱ्या सामाजिक मूल्य संस्कारांची जोपासना केल्यामुळेच तीन युवकांचे व एका लहान बालकाचे प्राण वाचविण्यात यश आले. हे मात्र निश्चित ....! .प्रा. डॉ. नाईकनवरे यांचा मूलतः स्वभावच सामाजिक व वैचारिक क्षेत्रात प्रबोधनकारी व सेवाभावी वृत्तीचा आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सर्वत्र होत आहे.
0 Comments