रेल्वेच्या विविध प्रश्नासंदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी दिले खासदारांना निवेदन
सांगोला (प्रतिनिधी): वासुद रेल्वे गेट क्र. 33 चे भुयारी मार्गाचे काम तातडीने करावे, मिरज रेल्वे गेट व महूद रेल्वे गेट या ठिकाणी उड्डाणपूल, पंढरपूर-मुंबई ट्रेन सांगोल्यापर्यंत वाढवावी यासह सांगोल्यातील डाळिंबासह अन्य फळांना दिल्लीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नवीन ट्रेन सुरू करण्यासाठी भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याशी चर्चा केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, श्रीकांतदादा देशमुख, नगरसेवक आनंदा माने, दत्ता टापरे, शिवाजीराव गायकवाड, विठ्ठल केदार, अभिजित नलवडे, संभाजी आलदर, विजय बाबर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगोला तालुक्यातील रेल्वेच्या अडचणी मांडल्या. वासुद रेल्वे गेट क्र.33 या ठिकाणी तातडीने भुयारीमार्गाचे काम करावे, मिरज रेल्वे गेट आणि महूद रेल्वे गेट या ठिकाणी उड्डाणपूल निर्माण करणे, सांगोला तालुक्यात उत्पादित होणाऱ्या डाळिंबाला दिल्लीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सांगोला मार्गे दिल्ली ट्रेन सुरू करावी, सांगोला तालुक्यातून पुणे, मुंबईला दररोज जाणाऱ्या प्रवाशांची संख्या हजाराच्या घरात आहे. प्रवाशांचा प्रवास कमी दरात व सुखकर होण्यासाठी पंढरपूर-मुंबई ट्रेन सांगोल्यापर्यंत वाढवावी अशी मागणी खासदार रणजितसिंह निंबाळकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याकडे केली.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी मागणी केलेल्या प्रश्नांवर खासदार रणजितसिंह निंबाळकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्यासह रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांनी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन महिन्यांत तातडीने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार म्हणाले, खासदार रणजितसिंह निंबाळकर व रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून सांगोला तालुक्यातील रेल्वेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच सांगोला मार्गे दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद कडे जाणाऱ्या ट्रेन सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments