गुन्हेगारांनो मस्ती केली तर सोडणार नाही - पोलीस निरीक्षक निंबाळकर
अकलूज ( विलास गायकवाड )सदरक्षणाय खलनिग्रहनाय या ब्रीद वाक्याशी बांधिलकी जपत सामान्य माणसाच्या पाठीशी आम्ही पोलिस चोवीस तास तैनात असून, जरका कोणी सामान्य नागरिकांना त्रास देत असेल तर आम्हाला त्याची माहिती द्या, आम्ही माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेऊ तर मस्तीखोर गुंडांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांचा बंदोबस्त करू असे जाहीर अहवान अकलूज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी लावण्यात येणाऱ्या सूचना फलक द्वारे केले आहे. सदर फलकामध्ये जे कोणी बेकायदेशीर सावकारकीचा व्यवसाय करून लोकांची पिळवणूक करतात त्यांची तक्रार पोलिस स्टेशनला करावी. बेकायदेशीर सावकाराकडून नागरिकांनी घेतलेले पैसे परत करू नयेत, ज्या सरकारी कर्मचारी व पेंशनर यांचे बँक पासबुक किंवा इतर कागदपत्रे सावकाराच्या ताब्यात असतील तर ते त्यांनी तात्काळ सावकाराकडून घ्यावीत. जर सावकारांनी कागदपत्रे परत दिली नाहीत तर त्यांच्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करावी. शाळा, कॉलेज, एसटी स्टँड व रोडवर महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्यांची नावे माहिती असल्यास त्यांचे नाव, पत्ता, गाडी नंबर, मोबाईल नंबर किंवा वर्णन पोलिस ठाणेस कळवावे. कापड दुकानदार, मशिनरी विक्रेते, किराणा दुकानदार, सराफ दुकानदार व इतर सर्व किरकोळ व्यापारी लोकांना कोणी गुंड माल घेऊन पैसे देत नसेल, जबरदस्ती करत असेल, वर्गणीच्या नावाखाली पैसे मागत असेल, उदार द्या म्हणून शिवीगाळी दमदाटी करत असेल किंवा दुकानामध्ये दहशत निर्माण करत असेल तर त्याची तक्रार पोलिस ठाणेस करावी. हॉटेल, ढाबे, चायनीज सेंटर. पाणीपुरी व भेळपुरी, वडापाव सेंटर, परमिट रूम, वाईन शॉप, टी सेंटर, आईसक्रीम पार्लर, नाष्टा सेंटर व इतर खाद्यपदार्थ व पेयगह येथे येऊन कोणी गुंडगिरी करून जबरदस्तीने फुकटात खात असेल, पैसे देत नसेल, दमदाटी करत असेल, धमकी देत असेल तर त्याबाबत पोलिस ठाणेस कळवावे. बँक, एटीएम मधून पैसे काढल्यानंतर मोजण्यास कोणास देऊ नये. बँकेतून काढलेले पैसे गाडीच्या डिकीत ठेवताना चोर पाहत असतात त्यांच्याकडे लक्ष ठेवावे. रस्त्यावर तुमचे पैसे पडले आहेत असे म्हणून तुमची बॅग पळवली जाते त्याच्याकडे लक्ष देणे. मी बँकेतून बोलतोय, तुमचा एटीएम नंबर द्या, कोड नंबर दिला तर तुमचे बँकेतील सर्व पैसे ऑनलाईन काढून घेतले जातात त्यामुळे सावध रहा. जर कोणी बेकायदेशीर पिस्टल, रिव्हॉल्वर, बंदुक, चाकू, तलवार व हत्यारे जवळ बाळगून दहशत निर्माण करत असेल तर त्याची माहिती पोलिस ठाणेस कळवावी. जर कोणी गुन्हेगार दुकाने बंद करण्याबाबत जबरदस्ती करत असेल, दुकाने चालू करू देत नसेल किंवा जबरदस्तीने बंद पाळण्यास लावत असेल तर त्यांची माहिती पोलिस ठाणेस कळवावी. कोणी रस्त्यावर विना परवाना वाढदिवस साजरा करत असेल, रस्त्यावर तलवार व चाकू इत्यादी हत्यारांनी केक कापत असेल व रात्री गोंधळ घालत असतील तर त्याबाबत पोलिस ठाणेस कळवावे. जर कोणी गुंडागर्दी करत असेल, दुकाने चालू ठेवण्यासाठी पैसे मागत असेल, एखाद्या विशिष्ट परिसरामध्ये गुंडागर्दी करत असेल तर त्याची माहिती पोलिस ठाणेस कळवावी. नागरिकांनी, शालेय विद्यार्थ्यांनी ट्रीपल सीट गाडी चालवू नये. आपल्या लहान मुलांना गाडी चालविण्यास देऊ नये. लहान मुलांना गाडी चालविण्यास दिल्यास पालकांवर कारवाई करण्यात येईल. लायसन्स असल्याशिवाय गाडी चालवू नये. गाडी पार्क करताना रोडवर पार्क करू नये अशा प्रकारचे फ्लेक्स बोर्ड अकलूज पोलिस स्टेशनकडून अकलूजमध्ये लावण्यात येणार असून वरीलप्रमाणे गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तर जनतेने गुंडगिरी करणाऱ्या गावगुंडांची माहिती अकलूज पोलिस स्टेशन फोन नं. ०२१८५-२२२१०० व निर्भया पथक फोन नं. ८०८०१६७२१६ या क्रमांकावर कळवावी असे आवाहन पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.
0 Comments