वृक्षारोपण करताना भारतीय वृक्षांना प्राधान्य आवश्यक
पंढरपूर (प्रतिनिधी) :- “ निसर्ग संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण करत असताना भारतीय वृक्षांच्या बीजांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. ” असे मत सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते येथील श्री रुक्मिणी महिला विद्यापीठ संचलित अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिर येथे संस्थेच्या मार्गदर्शक सचिव सुनेत्राताई विजयसिंह पवार यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी आयोजित बीजगोळे बनविण्याच्या कार्यशाळेत बोलत होते. पुढे बोलताना सकारात्मक आशावाद व्यक्त करताना कवी रवि सोनार म्हणाले “ भारतीय वृक्षांची पाने, कळ्या, फुले, फुलांचा सुगंधी अर्क, तेल, फळे, फळांच्या बिया, खोड, चिक-डिंक, साल, मुळ्या, लाकूड आणि भुसा या सर्वच गोष्टी केवळ मानवालाच नव्हे तर असंख्य जीवजंतू, कीटक, पशू, पक्षी आणि प्राणी यांनाही उपयुक्त व अत्यावश्यक आहेत. म्हणूनच अधिकाधिक प्राथमिक शाळांमध्ये कार्यानुभव तासिके अंतर्गत हा प्रशिक्षणाचा उपक्रम राबविल्यास अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या मनात निसर्ग संवर्धनाविषयी निश्चितच जागृती निर्माण होईल. या कार्यशाळेत सामाजिक कार्यकर्ते रवि सोनार यांनी अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना देशी गायीचे शेण आणि कसदार काळी माती यांच्या संमिश्र चिखलाने भारतीय वृक्षांच्या बीजांचे बीजगोळे बनविण्याचे आणि ते सावलीत सुकविण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले. तद्नंतर अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिरच्या शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनींनी कडुनिंब, चिंच, एरंड, सिताफळ, रामफळ तसेच इतर भारतीय वृक्षांच्या बीयांचे दोन हजार बीजगोळे बनविले. कार्यानुभव तासिके अंतर्गत संपन्न झालेल्या या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्र. मुख्याध्यापक काशिनाथ गोगांव सर यांनी केले. राणीताई गावडे व आशाताई अवघडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर सुसेन गरड यांनी आभार प्रदर्शन केले.
0 Comments