'सेवा हमी'च्या अंमलबजावणीस मोबाईल ॲप्लिकेशन विकसित -- जास्तीत-जास्त वापर करण्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन
सोलापूर, दि. 26 - सेवा हमी हक्क कायद्याची अंलबजावणी प्रभावीरीत्या व्हावी. यासाठी RTS Maharashtra हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या मोबाईल ॲपचा जास्तीत जास्त नागरीकांनी वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकरी मिलींद शंभरकर यांनी केले आहे. सेवा हमी हक्क कायद्याची अमलबजावणी व्हावी यासाठी आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला. या कॉन्फरन्समध्ये सोलापूरातून मिलींद शंभरकर, महा ऑनलाईनचे जिल्हा समन्वयक शशीकांत इगवे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प संचालक रिझवान मुल्ला आदी सहभागी झाले होते. शंभरकर यांनी प्रत्येक कार्यालयाबाहेर सेवा हमी हक्क कायद्यातील अधिसूचित सेवा बद्दल माहिती दर्शक फलक लावावा. नागरीकांना जलद सेवा उपलब्ध करुन द्यावी अशा सूचना उपस्थित विभाग प्रमुखांना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, कृषि विभागाचे रवींद्र माने त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनिनियम (सेवा हमी कायदा ) 2015 लागू झाला आहे. राज्यातील 42 विभागांतील 476 सेवा या कायद्यानुसार अनुसूचित करण्यात आल्या आहेत. या कायद्याची अंमलबजावणी प्रभावी व्हावी व नागरीकांना सहज सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. ह्या ॲपमुळे नागरीकांना या सेवा कोठुनही मिळवता येणार आहेत तसेच अर्जाची स्थिती, विभागाने काढलेली त्रुटी तसेच त्याची पूर्तता सर्व काही ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या करता येणार आहे व सेवा मिळण्यास झालेल्या विलंबाबद्दल तक्रार करता येणे शक्य होणार आहे असे श्री. मुल्ला यांनी सांगितले.
0 Comments