राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नितीमत्ता कोठे गहाण पडली - तोडकर
[ प्रतिनिधी अकलूज ] ३५ सदस्यसंख्या असतानादेखील बाबाराजे देशमुख यांचा पराभव झाला.३७ सदस्यसंख्या असताना राष्ट्रवादीचा अध्यक्ष न होता अपक्ष संजय शिंदे अध्यक्ष झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नितीमत्ता कोठे गहाण पडली होती. आता त्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे उमेदवार पराभूत झाल्याने यांना व्हीप व पक्षशिस्तीची आठवण येऊ लागली आहे. यांना पक्षशिस्तीचा आव आणण्याचा नैतिक अधिकार उरलेला नसल्याची टीका जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांनी केली.
सोलापूर जिल्हा परिषद समविचारी पक्षाचे अनिरुद्ध कांबळे यांची अध्यक्षपदी तर यांची उपाध्यक्षपदी दिलीप चव्हाण यांची झालेली निवड राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलीच सलत आहे. या सलीची जाण या नेत्यांना सन २०१२ व २०१७ साली झालेल्या राजकीय नाट्यावेळी का झाली नाही? असा प्रतिप्रश्न अरून तोडकर यांनी उपस्थित केला आहे. सन २०१२ साली विषय समित्यांच्या निवडीवेळी शिवाजी कांबळे व जयमाला गायकवाड बिनविरोध झाले. त्यानंतर बाबाराजे देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लावली गेली. यामध्ये बाबाराजेंचा पराभव घडवून आणला गेला. वास्तविक पाहता त्यावेळी सभागृहात राष्ट्रवादीचे ३५ सदस्य होते. तरीदेखील बाबाराजे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी मंगळवेढ्याच्या शिवानंद पाटलांना ४४ मते मिळाली होते. येथे राष्ट्रवादीची मते फुटली होती. या संदर्भातील तक्रारी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत करण्यात आल्या होत्या. परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची कसलीही दखल न घेता केवळ वेळ मारून नेण्याची नाटकबाजी केली होती. या निवडीवेळी माळशिरस तालुक्यातील सात सदस्यांनी प्रामाणिकपणे पक्ष सांगेल तसे काम केले होते असे अरुण तोडकर यांनी सांगितले.
त्यानंतर सन २०१७ च्या निवडणुकीवेळीही राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष शिस्त व पक्षनिष्ठा बाजूला सारून सोयीस्कर भूमिका घेतली होती. यावेळी राष्ट्रवादीचे २३ ,राष्ट्रवादी पुरस्कृत ३, शेकापचे २ आणि काँग्रेसचे ७ असे एकण ३७ संख्याबळ असतानादेखील अपक्ष संजय शिंदे बिनविरोध जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले होते. तत्कालीन पक्षनेते बळीराम साठे व्हीप बजावणार होते मात्र अचानक राष्ट्रवादीने आपला अध्यक्षपदाचा उमेदवार मागे घेऊन संजय शिंदे यांना बिनविरोध अध्यक्ष करण्याची नामुष्कीची भूमिका बजावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणे सहज शक्य होते तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणाच्या सांगण्यावरून पक्षाची अस्मिता अपक्षांच्या वळचणीला नेऊन ठेवली याचा खुलासा आज तागायत झालेला नाही. दोन वेळेला राष्ट्रवादीने सोयीस्कर भूमिका घेतल्याने पक्षाची वाताहत झाली. यंदा माळशिरस तालुक्यातील सदस्यांनी मागची परतफेड व्याजासकट केल्याने एवढे टोचण्याचे काही कारण नाही असे अरुण तोडकर यांनी सांगितले. वास्तविक पाहता माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक सर्व सदस्य मनाने भाजपवाशी झालेले आहेत. केवळ तांत्रिक अडचणीमुळे ते राष्ट्रवादीचे दिसतात. त्यांच्याकडून राष्ट्रवादीने सहकार्याची भूमिका ठेवणे इष्ट नसल्याचे अरुण तोडकर म्हणाले. सन २०१२ व सन २०१७ साली पक्षनिष्ठा गहाण ठेवणाऱ्यांनी सध्या आम्हाला पक्षनिष्ठेचे शहाणपण शिकवू नये असे अरूण तोडकर म्हणाले.
भाजपबरोबर जाऊन उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना पक्षाने पुन्हा उपमुख्यमंत्री पद बहाल केले. त्यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही. येथे पक्ष शिस्त व पक्षनिष्ठा का विचारात घेतली गेली नाही? माळशिरस मधील मोहिते पाटील गटाचे सर्व सदस्य मनाने भाजपचे केंव्हाच झाले आहेत. केवळ तांत्रिक दृष्ट्या ते राष्ट्रवादीत दिसत आहेत. यांच्यावर कारवाई करण्यासाठी मात्र राष्ट्रवादी जीवाचं रान करत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते मात्र आपला पक्ष कोणाच्याही वळचणीला नेण्यात मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्यावर मात्र कारवाई केली जात नाही आणि इथे मात्र जिल्हा परिषद सदस्यांना बळी देण्यासाठी विशेष लक्ष दिले जाते.पक्षाच्या या दुटप्पी धोरणाबद्दल जनतेतून तीव्र रोष व्यक्त होत आहे.

0 Comments