राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
सोलापूर शहर राष्ट्रवादीकडून बळीराजासाठी २ लाखांचा निधी
सोलापूर- ( प्रतिनिधी ) - राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस येत्या १२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात अनावश्यक खर्चाला फाटा देऊन राज्यातील संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून सुमारे ८० लाखांचा निधी संकलित करून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांना सुपूर्द करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सुमारे २ लाखांचा निधी बळीराजासाठी संकलित करून देण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली .
अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतीचे आणि पिकांचे सर्वदूर प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक गेले. जमीन निकामी झाली. बी-बियाण्यांना पैसे नाही. जनावरांना जगवणे अवघड बनले आहे. पिकविम्याचे संरक्षण नाही. कर्जाचा बोजा वाढतच चाललाआहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या अन्नदाता बळीराजाला सावरले पाहिजे ,त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी खुद्द शेतकऱ्यांचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारच पुढे सरसावले आहेत. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन बळीराजाला उभारी देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी शेतकऱ्यांना निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापुरातून दोन लाखांचा निधी संकलित करण्यात येणार आहे. याशिवाय फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्याबरोबरच निरोगी आरोग्यासाठी दररोज वॉकिंग करणाऱ्या शहरातील नागरीकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे स्वागत करून त्यांच्यासोबत २ किलोमीटर वॉकिंग करण्याचे बैठकीत ठरले असल्याचे अध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.
बैठकीला पक्षाच्या सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments