सोलापुरातील जातिवंत खेळाडू, प्रतिभावंत वकील आणि मुख्य जिल्हा न्यायाधीश नितीन प्रभाकर दळवी यांच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 5, 2019

सोलापुरातील जातिवंत खेळाडू, प्रतिभावंत वकील आणि मुख्य जिल्हा न्यायाधीश नितीन प्रभाकर दळवी यांच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सोलापुरातील जातिवंत खेळाडू, प्रतिभावंत वकील आणि मुख्य जिल्हा न्यायाधीश  नितीन प्रभाकर दळवी यांचे  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन 


सोलापुरातील जातिवंत खेळाडू, प्रतिभावंत वकील आणि मुख्य जिल्हा न्यायाधीश पदापर्यंत पोहोचलेल्या नितीन प्रभाकर दळवी यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचा मागे पत्नी, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. (कै.) दळवी यांनी न्यायाधीश पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन उच्च न्यायालयात पुन्हा वकिली सुरू केली होती. उमद्या स्वभावाच्या मित्राच्या आठवणी जागवल्या आहेत श्री. विवेक वैद्य यांनी...
              आमच्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठा. पण कधीही ज्युनिअर म्हणून आम्हाला वागवले नाही . कायम सामावून घेतले. बरोबरीने वागवले. खेळ मग कोणताही असो नितीन क्षणात आत्मसात करायचा. विशेष प्राविण्यासह खेळायचा . जन्मजात खेळाडू, कप्तान, लढवैया. सगळेच खेळ खेळायचा; पण उल्लेखनीय कौशल्य व प्राविण्य हॉकी व क्रिकेटमध्ये. हॉकीतील डॉजिंग , ड्रिबलिंग, फिनिशिंग टच वाखाणण्याजोगे. हॉकीमध्ये राष्ट्रीय पातळीवर तो चमकला. क्रिकेट मध्ये विद्यपीठ खेळाडू. आम्ही त्याच्या कॅप्टनशिपखाली खेळलेलो आहोत. प्रत्यक्ष मैदानावरचा सहवास व अनुभव आहे. तीच कथा क्रिकेटमधील. असा टिच्चून बॅटिंग करायचा की पहात रहावे . एक प्रसंग आठवतो. सोलापूर कॉलेजमध्ये बारावीत असताना झोनल मॅचेस सुरु होत्या . त्या दिवशीची मॅच कॉलेजच्या ग्राऊंडवरच होती . नितीन गोलंदाजांवर तुटून पडला होता , फोडून काढत होता , अक्षरशः तुडवत होता . प्रिंन्सिपॉल जे आर शहा सरांचा केमिस्ट्रीचा पिरियड सुरु होता . आमचे स्पोर्ट्सचे टीचर व कोच श्रीयुत पॅटी सरांनी वर्गात येऊन ( शब्दशः घुसून ) प्रोफेसर जे आर शहांच्या मर्जीविरुद्ध जाऊन क्लास बंद करायला भाग पाडून सर्वांना ग्राऊंडवर आणले होते . नितीन आतषबाजी करत डोळ्यांचे पारणे फेडत होता . एक अविस्मरणीय खेळी पहायला मिळाली होती . आम्ही जल्लोश , चिअरिंग करताना बेभान झालो होतो . त्या मॅचमध्ये नितीनने दीडेकशे रन लीलया कुटले होते . अजूनही ती झुंझार नेत्रदीपक खेळी तनामनात आहे . उर्वरित आयुष्यभर राहील .
              सोलापूर कॉलेजला एडमिशन घेतली होती तेव्हा सायन्स कॉलेज असल्याने स्पोर्ट्सच्या नावाने बोंबच होती . आपल्याला दोन बॅच सिनियर असलेले नितीन दळवी ( नित्या ) व संजय शहा ( भांजा ) व आदरणीय पॅटीसर यांच्यामुळे स्पोर्ट्स वातावरण जिवंत होते , टिकले होते . जिथे ११ खेळाडूंची टीम बनणे संभव नव्हते तिथे टीम बनवणे , प्रॅक्टिस करुन घेणे , ट्रेनिंग देणे व जिंकलेले पहायला मिळणे हे सर्व वरील तिघांमुळे शक्य झाले होते . भरपूर , मनसोक्त व यशस्वी खेळलो तेथील दोन वर्षे . आमच्या मते नितीनने स्पोर्ट्सवरच कॉन्सन्ट्रेट करुन पुढे जायला पाहिजे होते . तो हॉकीच्या महाराष्ट्राची टीमच काय पण नॅशनल टीममध्ये खेळायच्या योग्यतेचा होता . ही अतिशयोक्ती किंवा मित्र म्हणून गुणवर्णन न करता वस्तूस्थिती म्हणून सांगतोय . पण त्याला इंजिनिअर व्हायचे होते . खरंतर अफलातून स्पोर्ट्समन . वडील सोलापूरातील ख्यातनाम वकील . त्यानेही वकील व्हावे असे त्याच्या वडिलांना व आम्हा मित्रांना वाटायचे . याला कारणही तसे समर्पक होते . असे की , हा अतिशय मुद्देसूद भांडायचा . वाद घालायचा . कुठल्याही शाब्दिक चकमकीत समोरच्याला निपचित व निरुत्तर गारद करु शकायचा . अट्टाहासाने इंजिनियरिंगला गेला . रमला नाही . एकच वर्ष इंजिनियरिंग करुन रामराम ठोकला व सोलापूर कॉलेजला परत येऊन बीएससी जॉईन केला . टी वाय बीएससीला आर्ट्सला गेला . बीए करून एल एल बी झाला . शेवटी एकदाचा वकील झालाच . हा अचाट बेफाट अद्भुत प्रवास काल कायमचा थांबला . थेट मुंबईत एफिलिएट कोर्टात जजचा हुद्दा भूषवण्यापर्यंत मजल मारली नितीनने . अचंबित करुन टाकणारं अतिशय वेगवान घटनांनी भरलेलं आयुष्य जगला नितीन .
           नितीन कायम हसतमुख , उत्साही , आनंदी , तल्लखबुद्धी , नैसर्गिक विनोदबुद्धी असा होता . टिंगलटवाळी , चेष्टामस्करी करायचा. तीही हलकीफुलकी निरोगी सकारात्मक असायची . मौजमजा करताना असा मिश्कील असायचा की ज्याची टर , हुर्यो उडवलीय त्याला पण राग येत नसे . चहाटळपणा , खोडसाळपणा करतानासुद्धा आचरट व दर्जाहीन , पातळी सोडून नसायचा .
              एकदा कॉलेजात असताना भांजाच्या ( संजय शहा ) या वर्गमित्राच्या घरी गेला होता . ( ही एक तत्कालीन अजब अद्भुत अनाकलनीय अफलातून जोडगोळी होती ) . भांजा घरी नव्हता . त्याच्या बहिणीने विचारले की कोण येऊन गेला म्हणून सांगू ? नित्या म्हणाला डुणूंग येऊन गेला असे सांग . भांजाची बहिण म्हणाली कोण डुणूंग ? नित्या म्हणाला सुस्सच्या शेजारी रहाणारा असे सांग . आणि निघून गेला . भांजा आल्यावर बहिणीने सांगितले की तुझा कोणी मित्र आला होता . भांजाने विचारले कोणता मित्र होता ? बहिण म्हणाली कोणीतरी डुणूंग म्हणून होता . भांजा भंजाळून म्हणाला कोण डुणूंग ? तेव्हा ती म्हणाली की सुस्सच्या शेजारी रहातो म्हणे . शून्य सेकंदात भांजा खिंकाळला , हो हो म्हणजे नित्या .
बहिणीला आजपर्यंत वरील शब्द व भाषेच्या नावाखालचे आवाज कळालेले नाहीत .
               मला नेहमी एक गोष्ट सांगून हैराण करायचा . म्हणायचा आमच्या बहिणीशी लग्न कर . मी इरिटेट व्हायचो . ओशाळायचो . पण सातत्याने हा विषय काढायचा व जेरीस आणायचा . मला त्याची कौटुंबिक माहिती नव्हती . मल्ल्याला माहिती होती . दोघेही गडगडाट करुन हसायचे व रळ्ळकन जमिनीवर सांडून गडाबडा लोळायचे . ( सदर शब्दप्रयोगही नित्याचेच बरं का ). काही महिन्यांनी मला खात्रीलायक समजले, की नित्याला बहिणच नाहीए .
              आठवणी प्रसंग किस्से अगणित आहेत . आता फक्त उरल्या त्या आठवणी. कधीही परत न येण्यासाठी नितीन गेलाय. खरं वाटत नाहीये पण सत्य आहे . हवाहवासा वाटणारा नेमका मित्र हिरावून घ्यावा हा तर नियतीचा आवडता खेळ . आणि खेळ म्हणले की लगेच जायला तयार होतो , तो खरा खेळाडू .
        आपण हरलो नियतीसमोर या मॅचमध्ये; पण नितीन कसलीतरी अनामिक मॅच जिंकण्यासाठी पुढे गेलासुद्धा!

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages