Hot Posts

6/recent/ticker-posts

या तर राजकीय वेश्याच !

या तर राजकीय वेश्याच !
सध्या भाजप-सेनेत खास करून भाजपात मोठ्या प्रमाणात नेत्यांचे इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या उडत्या पक्षांचे थवेच्या थवे इकडे येवून विसावू लागले आहेत. भाजपवाल्यांना तर यामुऴे आभाऴच ठेंगणे झाले आहे. आता देशातला विरोध आणि विरोधी पक्षच संपला या अविर्भावात ते वावरू लागले आहेत. सत्तेच्या जोरावर इकडचे सगऴे भानगडबाज हूक लावून तिकडच्या तंबूत घेतले जात आहेत. आयुष्यभर सत्तेच्या वऴचणीला राहून संधी साधलेले सगऴे संधीसाधू परत सत्तेच्या वऴचणीला जात आहेत. खरेतर यात त्यांचा काय दोष ? ते तसेच आहेत. सत्ता आणि संपत्ती हेच त्यांचे ध्येय होते आणि आहे. ते भाजपात आले तरी तेच करणार. मुऴात भाजपाच्या तंबूत उड्या मारण्याचे कारण हेच की आपली कुकर्म झाकली जावीत, ती उघडी पडू नयेत, सत्तेेच्या आडोश्याला राहून सत्तेचा फायदा उपटता यावा हिच पक्षांतराची कारणे आहेत. या लोकांच्याकडे यापेक्षा वेगऴा ध्येयवाद, विचार कधीच नव्हता. आजवर त्यांची हिच खाज काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पुर्ण होत होती. आता हे पक्ष ती पुर्ण करू शकत नाहीत त्यामुऴे त्यांनी भाजपात म्हणजे सत्तेच्या वऴचणीला उड्या मारल्या आहेत. उद्या हे सत्तेतून पायउतार झाले की यांना सोडून ते शरद पवारांच्या व सोनियांच्या चरणावर तऴवे चाटायला येणारच.

      सध्या अशाच संधीसाधूंचा व तऴवेचाटूंचा जमाना आहे. ना कुठले ध्येय, ना कुठला विचार किंवा ना कुठले उदिष्ट्य. फक्त सत्तेच्या कासेला चिटकून रहायचे आणि सगऴे फायदे उपटायचे बस इतकेच ध्येय असते या लोकांचे. त्यांची यापेक्षा कुठली विचारधारा नाही, आचारसंहीता नाही की निष्ठा नाही. जिथे तुकडे फेकतील तिथे जावून शेपूट हलवायचे व तुकडे फेकणाराचे पाय चाटायचे. हाच प्रकार सर्वत्र बोकाऴला आहे. राजकारणात या संधीसाधूंच्या टोऴ्या तयार झाल्या आहेत. या टोऴ्या हाताशी धरूनच काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्य केले. हे सगऴे सरंजाम, संस्थानिक सत्तेला चिकटलेले गोचिड आहेत. सत्तेच्या कासेला चिटकून सत्तेचे रक्त पित पितच हे मोठे झाले. सात सात पिढ्या जगतील इतकी माया या भानगडबाजांनी कमावली आहे. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना व भाजपा असे वर्तुऴ पुर्ण केले आहे. या लाऴघोट्यांनी लोकांना गृहीत धरले आहे. आपण कुठेही गेलो, कशाही उड्या मारल्या तरी आपले गुलाम आपल्यासोबतच असणार याचा त्यांना ठाम विश्वास आहे. त्यामुऴे त्यांना कशाही उड्या मारताना, तडजोडी करताना लाज वाटत नाही, लोकांची भिती वाटत नाही. काँग्रेसवाले सत्तेत आले की परत यांच्या उड्या काँग्रेस-राष्ट्रवादीत ठरलेल्या आहेत.

     राजकारणाची पातऴी खुपच घसरतेय हल्ली. असले बाजारबुणगे राजकारणात गाजरगवतासारखे वाढतायत. ज्यांना कुठलाच विचार नाही, ज्यांची कुठलीच विचारसरणी नाही असे लोक राजकारणात बहूसंख्य होतायत. खरेतर राजकारणातल्या प्रत्येक व्यक्तीकडे त्याची त्याची ठाम विचारसरणी असली पाहिजे. ती त्याने जगली पाहिजे. त्याच्या आचरणात असली पाहिजे. भारतीय राजकारणात राजकारणात एक काऴ असे नेते होते. ते आयुष्यभर विचाराला चिकटून राहिले. सत्तेचे व सत्ताधार्यांचे तऴवे चाटायला कधीच गेले नाहीत. अख्खे आयुष्य सत्तेच्या विरोधात काढले पण सत्तेचा मोह केला नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे उध्दवराव पाटील यांना काँग्रेसने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती पण ते हलले नाहीत. सत्तेच्या वऴचणीला गेले नाहीत. सत्तेच्या हाडकाला चघऴत बसणारी ती माणसं नव्हती. जुणे काँग्रेसी नेते असतील, समाजवादी, डाव्या विचारसरणीचे नेते असतील किंवा भाजपाचे असतील सगऴेच लायकीचे वाटत होते. सत्तेच्या विरोधात अनेक वर्षे संघर्ष करणारे जॉर्ज फर्नांडीस, श्रीपाद अमृत डांगे, एस एम जोशी, गणपतराव देशमुख, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी,  भाजपाचे अटलजी, अडवाणी, मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांनी सत्तेची फऴं लवकर चाखली असती पण त्यांनी त्यांचा विचार सोडला नाही. कारण ते विचार घेवून घडले होते. भले तो विचार चुकीचा कि बरोबर ? हा नंतरचा विषय. पण जो विचार होता तो त्यांनी जीवापाड जपला. त्यांची त्यांची त्यांच्या विचारावर, पक्षावर निष्ठा होती. ती निष्ठा ते जिवापड जपत होते. ही माणसं विरोधी पक्षात राहून, विरोधी राजकारण करून सत्ताधार्यांच्यापेक्षा मोठी झाली. त्यांनी राजकारणातली मोठी उंची गाठली. हल्ली राजकारणात वेश्यांचा बाजार भरलाय. सतत पक्षांतर करणारे लोक नेते कमी आणि वेश्याच जास्त वाटतात. वेश्या किमान ग्राहकाशी ईमान ठेवून राहतात. इथे हे सौदेबाज भामटे बापाशीही इमान ठेवत नाहीत मग पक्षाचा आणि लोकांचा विषयच सोडा. असले भ्रष्ट, विकावू, संधीसाधू आणि स्वार्थी लोक उद्या देशाचाही सौदा करतील. देशाच्या पाठीत खंजीर खुपसतील. ज्यांच्याकडे कुठलाच विचार नसतो त्यांना काय पडलय देशाचं आणि लोकांच ? आमदार बच्चू कडू म्हणतात तसे या असल्या विकावू नेत्यांसाठी लोकांनी पायताणंच काढली पाहिजेत. मतांऐवजी पायताण मारली पाहिजेत
Reactions

Post a Comment

0 Comments