
राष्ट्रवादी घड्याळाचे गेले ते आकडे आणि उरले ते काटे...महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पावरफूल समजला जात होता. परंतु सद्यस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाचे गेले ते आकडे आणि उरले ते काटे... असे म्हणण्याची वेळ आली आहे?स्वर्गीय वसंतदादा पाटील ,यशवंतराव चव्हाण, जनता पक्ष, कॉंग्रेस पक्ष, यांचे व इतरांच्या बाबतीत जी विचारसरणी शरद पवारांनी वापरून राजकीय पटलावर उत्तुंग भरारी घेत सत्ता शाबूत ठेवली. त्याच पवारणीतीच्या वापराला उजाळा मिळू लागला आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान करीत शरद पवारांनी राजकीय कारकिर्दीचा आणि चतुर बुद्धीचा योग्य वापर करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रूपाने राज्याच्या राजकीय पटलावर नवा संसार मांडला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक मातब्बर व्यक्तिमत्त्वांना एकत्रित करून, राष्ट्रवादी बांधणीला सुरुवात केली. यामध्ये तोलामोलाचा वाटा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा होता.
राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, आदी क्षेत्रावर मजबूत पकड असलेले प्रभावशाली, प्रतिभासंपन्न, प्रतिष्ठित आणि कर्तुत्ववान घराणे म्हणून मोहिते पाटील यांच्याकडे पाहिले जाते. राज्यातल्या राजकारणाबरोबरच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारनाचा केंद्रबिंदू ते होतेच परंतु विजयसिंह मोहिते-पाटील हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजले जात होते. अशातच पवारनीतीचा वापर त्यांच्याविरुद्ध होऊ लागला. पवार नीतीच्या षडयंत्राला वारंवार मोहिते पाटील यांना सामोरे जावे लागले.तर अत्यंत जिव्हाळ्याची लोककल्याणाच्या हिताची समजली जाणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण या महत्वकांशी योजनेची थट्टा राष्ट्रवादी कडूनच होऊ लागली. आणि हेच सहनशीलतेच्या पलीकडचे होते. अनेक वर्षाची घुसमट उफाळून आली आणि मोहिते पाटील यांनी राजकारणाची दिशा बदलली. मोहिते-पाटील यांनी दिशा बदलताच, एकामागून एक राष्ट्रवादीला रामराम ठोकू लागले. सोलापूर जिल्ह्यातला राष्ट्रवादीचा बालेकिल्लातर उध्वस्त झालाच परंतु माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी किंमत मोजावी लागली. सध्या राज्याच्या राजकारणातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुई सपाटीच्या मार्गावर असून राष्ट्रवादी घड्याळाचे गेले ते आकडे आणि उरले ते काटे ... असे म्हणण्याची वेळ आली ...?
0 Comments