बिर्लाजी ! ब्राम्हण तुप-साखर टाकतात काय ?*
भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, "ब्राम्हण, हा जन्मताच श्रेष्ठ असतो !" असे वक्तव्य केले आहे. २१ व्या शतकात मानवी उत्क्रांतीच्या व विद्नानाच्या उत्क्रांत अवस्थेत हे वक्तव्य केलं जाते आणि ते ही भारताच्या संसदेचे अध्यक्ष करतात, हे किती भंयकर आहे ? ओम बिर्लांची मानसिक विकृती कुणाला जातीयवादी वाटत नाही काय ?ओम बिर्ला जे बोलले तोच भ्रम मनातल्या मनात ठेवणारे लाखो लोक या भारत भूमीत आहेत. मागे एका न्यायाधिशानेही असे वक्तव्य केलेले होते.
वर्ण वर्चस्वाची हागणदारी जर संसदेचा अध्यक्ष असलेल्या माणसाच्या डोक्यात असेल, एखाद्या न्यायाधिशाच्या मस्तकात असेल तर याला काय म्हणावे ? असली सडकी मस्तकं पुन्हा या देशाला जातीयवादाचा नरक केल्याशिवाय राहणार नाहीत. या देशात संविधान आले अन या विकृतीला आव्हान मिऴाले. बर्याच अंशी ही प्रवृत्ती रोखली गेली. संविधानाने सर्वांना बरोबरीचे अधिकार दिले. कुणी कनिष्ठ, कुणी श्रेष्ठ ? असे ठेवले नाही. माणूस बारीक-मोठा होतो तो त्याच्या जन्माने नव्हे तर कर्तृत्वाने होतो. जन्माने कुणीच बारिक-मोठा किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ ठरत नाही. काही अपवाद सोडले तर तमाम जीव सृष्टीचा प्रजननाचा नियम व पध्दत सारखीच आहे. पशू योनी पासून ते मानव योनीपर्यंत एकच पध्दत आहे. नर आणि मादीचे मिलन होते. त्या मिलनात नर मादीच्या गर्भाशयात विर्य सोडतो. त्यातून बहूतेक जीवांचा जन्म होतो. (शास्त्रीय भाषेच्या तपशीलात जात नाही) काही अपवादात्मक प्राण्यांच्यात, वनस्पतीच्यांत व किटकांच्यात फरक आहे. तो फरक सोडला तर सगऴ्यांची जीवशास्त्रीय प्रक्रीया सारखीच आहे. अखिल मानव जातीची तर हिच पध्दत आहे. या जगातला कुठलाही मानव या प्रक्रियेशिवाय जन्माला येत नाही. तो मग जगातल्या कुठल्याही देशातला, खंडातला किंवा कुठल्याही जाती-धर्माचा असला तरी हिच पध्दत आहे. तरीही ओम बिर्ला, "ब्राम्हण, हा जन्मानेच श्रेष्ठ असतो !" असे म्हणत असतील तर ब्राम्हणांची प्रजननाची प्रक्रिया वेगऴी असते की काय ? दोन चमचे साजूक तुप, बदामाचे चार दाणे, थोडीशी वेलची, लवंग आणि चवी पुरती साखर वगैरे फार्म्युला असतो की काय ? अशा पध्दतीने जन्म होत असेल तर तसे असेलही बुवा. नेमका काय प्रकार आहे ? ते ओम बिर्लांनाच ठाऊक.
पिढ्यान-पिढ्याच्या वर्चस्ववादी अहंकाराने हा गंड पोसला गेलाय, हा समज दृढ झालाय. तो टाकायची, या वर्चस्ववादी मानसिकतेचा त्याग करायची इच्छा होताना दिसत नाही. अनेक ब्राम्हण बांधवांनी या विकृत्तीचा त्याग केलाय. ही विकृती आहे. याच विकृत्तीला ब्राम्हण्य म्हणतात. ही विकृती जशी ब्राम्हण जातीत आहे. तशीच ती जाती व्यवस्थेच्या उतरंडीतील इतर जातीतही आहे. त्यांचेही असेच समज आहेत. ते ही असाच समज घेवून कनिष्ठ जातीला लाथाऴ्या मारताना दिसतात. २१ व्या शतकात भारतातले हे जात वास्तव अंगावर काटा आणणारे आहे. जगाचा अध्यात्मिक गुरू व्हायची स्वप्ने पाहणार्या देशातल्या लोकांचे ह्रदय जर असे संकुचित असेल, आपल्याच माणसाला, देश बांधवाला तो निच, कनिष्ठ ठरवत असेल तर खाक अध्यात्मिक गुरू होणार का ? बिर्लांच्या विकृत मानसिकतेवर लिहीले की अनेकजन बोंबलणार आहेत. तुम्ही जातीयवादी आहात, ब्राम्हणविरोधी आहात असा आरोप आमच्यावरच करणार. ब्राम्हण्यवादाचे काही गुलाम तर सुपारी किंवा वकीलपत्रच घेवून असतात. ब्राम्हण्यवादावर लिहीले की आम्हालाच जातीयवादी, ब्राम्हणविरोधी ठरवून बोंबा मारायला सुरूवात करतात. स्वत:चे वैचारिक अंग गहाण टाकलेले लोक तारतम्याने अजिबात विचार करत नाहीत. त्यांना विचार करण्याची जणू अँलर्जी आहे. अशाच मानसिकतेचे सत्ताधारी असतील तर देश कुठल्या दिशेने निघालाय ? हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. उद्याचे या देशाचे भवितव्य काय असणार ? या बाबत चिंता वाटल्याशिवाय रहात नाही. भारताच्या खांद्यावरचे जातीयवादाचे भुत कधी उतरणार की नाहीच ? हा प्रश्न अस्वस्थ करून जातो. आम्ही सारे माणूस म्हणून, भारतीय म्हणून कधी जगायला सुरूवात करणार की नाही ? हा प्रश्न अक्राऴ-विक्राऴ वाटू लागतो. "नवा भारत" नावाने जे पँकींग येणार आहे ते वर्ण वर्चस्वाच्या उतरंडीची घाण घेवून येणार आहे की काय ?
0 Comments