
महिलांवर, दलितांवर, अल्पसंख्याकांवर अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर मोदी लगेचच भाष्य करीत नाहीत आणि या प्रकरणांत गुंतलेल्या स्वपक्षातील नेत्यांवर-कार्यकर्त्यांवर कारवाईसाठी पाऊल उचलत नाहीत; या घटनांवरून राजकारण तापल्यानंतर व्यापक तत्त्वज्ञान मांडत, कोणाची हयगय करणार नाही, असे वक्तव्य करीत ते मौन सोडतात, असा आजवरचा अनुभव आहे. कठुआ आणि उन्नाव येथील घटनांच्या प्रकरणातही त्यांनी उशिरानेच वक्तव्य केले. मौन सोडतानाही त्यांनी या घटनांचा थेट उल्लेख केलेला नाही. त्यांमधील दोषींवर कारवाईची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी, स्वपक्षातील ठपका असलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडण्याऐवजी भारतीय जनता पक्षाचे काही समर्थक, कॉंग्रेसच्या राजवटीतील अशा घटनांकडे अंगुलिनिर्देश करीत आहेत. मोदींचे मौनव्रत सुटायच्या आदल्या रात्री कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत इंडिया गेट परिसरात मेणबत्ती मोर्चा काढला. राजकीय हितसंबंध जपण्याच्या पलीकडे जाऊन अशा घटनांकडे आपले नेते माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कठुआ आणि उन्नाव येथे अत्याचार करणारे पाशवी वृत्तीचे असून, ते कितीही सामर्थ्यवान असले आणि सत्ताधार्यांशी त्यांची कितीही जवळीक असली, तरी त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई होण्यासाठी पावले पडायला हवीत. मात्र, तसे झाले नाही. उन्नावमधील अत्याचारात सत्ताधारी भाजपच्या आमदारावरच ठपका असल्याने पोलिसांनी सुरुवातीला त्याच्या विरोधात गुन्हाही नोंदवून घेतला नाही. ते बिचारे कोठडीतच मरण पावले. हे सारे घडत असताना उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार काहीही करत नव्हते. पोलिसांनी तर बघ्याचीच भूमिका घेतली होती. अखेर उच्च न्यायालयाने आरोपी आमदार कुलदीप सेंगर याला अटक करण्याचा आदेश दिल्यावरच सरकार हलले. कठुआमधील आरोपींनीही हिंदुत्ववादी संघटनेची मदत घेऊन झाल्या प्रकाराला हिंदू आणि मुस्लिम असा धार्मिक रंग देऊन बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. हिंदू एकता मंच या संघटनेने मोर्चाही काढला आणि जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी भाजपचे दोन मंत्री - चौधरी लालसिंह आणि चंद्रप्रकाश गंगा - हे त्यात सहभागी झाले. या दोघांनी मंत्रिपदाचा राजीनामाही पक्षाकडे देऊ करून दबावतंत्राचे राजकारण अवलंबले आहे. एकूणच या अत्याचारांना राजकीय वळण देण्याचा, आपल्या समर्थकांना भडकावण्याचा आणि त्याद्वारे सामाजिक सलोखा बिघडविण्याचाच उद्योग होतो आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील घटना जानेवारीत घडली आहे, तर उत्तर प्रदेशातील उन्नावमधील घटना गेल्या जूनमध्ये. कठुआत मंदिराच्या आवारातच अत्याचार झाले आणि त्यातील मुख्य आरोपी असलेला सांझीराम हा देवस्थानचा प्रमुख आहे.
आठ वर्षांच्या बालिकेवर नरराक्षसांनी पाच दिवस अत्याचार केले आणि नंतर तिला मारून टाकले. गुन्हा लपविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला; शिवाय जनसामान्यांचे मन कलुषित करण्यासाठी या अत्याचाराचा संबंध गोहत्येशी जोडला. भाजपच्या एका खासदाराने तर पाकिस्तानशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. कोणतेही थातूर मातूर कारण देऊन, हिंदू-मुस्लिम असा भेद करून, पाकिस्तानशी बादरायण संबंध जोडून या अमानवी अत्याचाराचे समर्थन करताच येत नाही. एका निष्पाप बालिकेवर अत्याचार करणारे कामपिसाटच असतात. कठुआ आणि उन्नाव या दोन्ही घटनांतील आरोपींनी केलेला प्रकार घृणास्पद आहे. त्यांना कठोर शिक्षा मिळावी तरच पीडितांना न्याय मिळेल.
0 Comments