सोलापूरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 17, 2026

सोलापूरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी

 सोलापूरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘प्रिसिजन गप्पा’ या सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा २० ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘दिवाळीनंतरची गप्पांची दिवाळी’ रंगणार असून, संगीत, साहित्य, सामाजिक कार्य आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयांची मेजवानी सोलापूरकरांना अनुभवता येणार आहे. हा तीन दिवसीय कार्यक्रम सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
यंदाचे हे प्रिसिजन गप्पांचे १८ वे वर्ष असून, शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक संशोधक व विचारवंत पद्मश्री डॉ. हिमतराव बावस्कर यांच्या हस्ते दोन्ही पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यंदाचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार पुणे येथील ‘थिंक क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच’च्या ‘निसर्गवारी’ प्रकल्पाला प्रदान करण्यात येणार असून, प्रकल्पाचे प्रवर्तक प्रशांत अवचट हे पुरस्कार स्वीकारतील. या पुरस्काराचे स्वरूप तीन लाख रुपये व सन्मानचिन्ह असे आहे. तसेच स्व. सुभाष राजवजी शहा स्मृती पुरस्कार चाळीसगाव येथील राजेश ठोंबरे यांना त्यांच्या सर्पमित्र आणि वन्यजीव संवर्धन कार्यासाठी दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणानंतर डॉ. हिमतराव बावस्कर यांची प्रकट मुलाखत दत्ता जोशी घेणार आहेत.
शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील अजरामर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध संगीत अभ्यासक व गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचा ‘रहे ना रहे हम’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. हिंदी सिनेसंगीताचा सखोल अभ्यास, गाण्यांच्या आठवणी आणि संगीतप्रवासाचा वेध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. त्यांना निलेश निरगुडकर, केदार परांजपे, ऋषिराज साळवी, दिगंबर मानकर आणि व्यंकटेश कुलकर्णी हे कलाकार साथसंगत करणार आहेत.अभिजित कुलकर्णी हे मृदुला दाढे यांच्याशी संवाद साधतील .
रविवार, २२ नोव्हेंबर रोजी प्रिसिजन गप्पांचा समारोप एका अविस्मरणीय संगीत कार्यक्रमाने होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या गेल्या ३० वर्षांच्या संगीतप्रवासाचा मागोवा घेणारा विशेष कार्यक्रम सादर होईल. ‘कवितेचं गाणं होताना...’ या कार्यक्रमात डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव शुभंकर कुलकर्णी आणि सन्मिता धापटे सहभागी होणार आहेत. डॉ. सलील कुलकर्णी यांची लोकप्रिय गाणी आणि संगीतनिर्मितीचा प्रवास रसिकांना अनुभवता येणार आहे.
या तीनही दिवसांचे कार्यक्रम सर्वांसाठी खुले असून,दररोज सायंकाळी ६.२५ वाजता कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.तरी सोलापूरकर रसिकांनी या तीन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याचा मोठ्या संख्येने आनंद घ्यावा, असे आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages