शिक्षण, जागरूकता आणि खेळ हीच नव्या पिढीच्या प्रगतीची त्रिसूत्री – उपराज्यपाल तरनजीत सिंह संधू
मुंबई(कटूसत्य वृत्त):-बदलत्या काळानुसार नव्या पिढीने शिक्षण आणि जागरूकता या दोन्हींची सांगड घालावी. तंत्रज्ञानाचा योग्य वापर, वाचनाची आवड आणि खेळातून मिळणारे सांघिक भावनेचे संस्कार यांच्या बळावर युवक देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देऊ शकतात, असे प्रतिपादन दिल्लीचे उपराज्यपाल तरनजीत सिंह संधू यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालय, नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहभागाने ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’ सुरू आहे. वाचनसंस्कृतीचा प्रसार, साहित्यिक विचारांची देवाणघेवाण आणि नव्या पिढीला पुस्तकविश्वाशी जोडणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात साहित्य, शिक्षण, कला आणि संस्कृती क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. महोत्सवात आयोजित ‘राजनैतिक चातुर्याचा संवाद’ या विशेष कार्यक्रमात उपराज्यपाल श्री. संधू बोलत होते. नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक कॅप्टन युवराज मलिक यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
सरदार तेजा सिंह समुंद्री यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची माहिती श्री संधू यांनी यावेळी दिली. गुरुद्वारा सुधारणा चळवळीतील (अकाली चळवळ) प्रमुख नेते, समाजसुधारक आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा त्यांनी विशेष उल्लेख केला. समाजातील सुधारणांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, शिक्षणाचा प्रसार आणि लोकसहभागातून संस्थात्मक बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या कार्याची माहिती त्यांनी दिली.सरदार तेजा सिंह समुंद्री यांच्या कार्याचा उल्लेख करताना संधू यांनी लोकशाही मूल्ये, समान सहभाग आणि सामाजिक सुधारणांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व आणि सहभागाची संधी मिळणे आवश्यक असल्याचा विचार त्यांनी मांडला. ऐतिहासिक काळातील सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत शिक्षण आणि संघटनात्मक प्रयत्नांची भूमिका किती महत्त्वाची होती, हेही त्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय संबंधांमधील आपल्या अनुभवांच्या आधारे त्यांनी राजनैतिक क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले. जागतिक घडामोडींचा अभ्यास, बदलत्या परिस्थितीनुसार दृष्टिकोन विकसित करणे आणि संवादाच्या माध्यमातून परस्पर संबंध दृढ करणे, ही राजनैतिक कार्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगाच्या कार्यपद्धतीत होत असलेल्या बदलांचाही त्यांनी उल्लेख केला.नव्या पिढीच्या विकासासाठी शिक्षणाबरोबरच कौशल्यविकास, वाचन, क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकास यांना महत्त्व देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी संपादन करण्यापुरते मर्यादित न राहता विविध विषयांचे ज्ञान मिळवावे, नवनवीन तंत्रज्ञान समजून घ्यावे आणि स्वतःमधील सर्जनशीलता विकसित करावी, असे त्यांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा योग्य आणि जबाबदारीने वापर करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. शिक्षक, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाची योग्य ओळख करून देतानाच त्यांच्यात स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळांचेही महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे श्री संधू यांनी स्पष्ट केले. खेळामुळे शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आव्हानांना सामोरे जाण्याची वृत्ती विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच क्रीडा आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या संवादातून इतिहास, समाजसुधारणा, शिक्षण, तंत्रज्ञान आणि राजनैतिक अनुभव अशा विविध विषयांची माहिती तरुणांना मिळाली. त्यांच्या निवडक प्रश्नांची उत्तरे श्री संधू यांनी यावेळी दिली.

No comments:
Post a Comment