औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा – मंत्री डॉ. उदय सामंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 27, 2026

औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा – मंत्री डॉ. उदय सामंत

 

औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा – मंत्री डॉ. उदय सामंत


ठाणे(कटूसत्य वृत्त):- उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध जिल्ह्यांतील औद्योगिक विकासाशी संबंधित विषयांचा आढावा घेण्यासाठी विविध बैठका घेण्यात आल्या. यावेळी औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार, भूसंपादन, नवीन एमआयडीसी क्षेत्रांची स्थापना, पायाभूत सुविधा आणि स्थानिक विकासाशी संबंधित विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, “राज्यातील औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी नवीन औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती, विद्यमान एमआयडीसींचा विस्तार आणि भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. या माध्यमातून औद्योगिक गुंतवणुकीला चालना देतानाच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे. विविध जिल्ह्यांतील औद्योगिक विकासकामांचा आढावा घेऊन संबंधित प्रश्नांवर समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे प्र. नाईक निंबाळकर, विधानपरिषद सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील, डॉ. मनीषा कायंदे, किसन कथोरे, आमश्या पाडवी, विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, राजेश पाडवी, राजेश मोरे, संजय गायकवाड, अमित झनक, लहू कानडे, विधानसभा सदस्य तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने उपस्थित होते.

यावेळी खंडाळा टप्पा क्र. ३ औद्योगिक क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे, लोणंद औद्योगिक क्षेत्राचा विस्तार, कोरेगाव तालुक्यातील मौजे तळवडे येथे औद्योगिक वसाहत स्थापन करणे तसेच अतिरिक्त फलटण औद्योगिक क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत आढावा घेण्यात आला. फलटण औद्योगिक क्षेत्रातील मुंढवडे क्र. सी-२ मधून नांदल गावातील शेतकऱ्यांना बायपास रस्ता उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

कोल्हापूर शहराचा समावेश करून ग्लोबल कॉम्पिटिव्हिटी सेंटर स्थापन करणे तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा या भागाचा इकॉनॉमिक झोन म्हणून विकास करण्याबाबत संबंधित विषयांचा आढावा घेण्यात आला. या माध्यमातून या परिसरातील औद्योगिक क्षमता, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या संधी वाढविण्याबाबत चर्चा झाली.

याशिवाय गडहिंग्लज, नवापूर, नांदगाव आणि वाशिम येथे नवीन एमआयडीसी स्थापन करण्याबाबत संबंधित विषयांवरही चर्चा करण्यात आली. खालापूर व कर्जत तालुक्यातील एमआयडीसी भागासाठी भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याबाबत तसेच नवापूर, जि. नंदुरबार येथील सहा ते सात शेतकऱ्यांना एमआयडीसीसाठी जमीन द्यायची नसल्याबाबतच्या विषयांचाही आढावा घेण्यात आला.

दुपारच्या सत्रात मुंबई महानगर प्रदेश आणि ठाणे जिल्ह्यातील स्वच्छता विषयक आढावा घेण्यात आला. तसेच विविध औद्योगिक क्षेत्रांतील पायाभूत सुविधा आणि आदिवासी क्षेत्राच्या विकासाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम करणे, स्थानिक पातळीवरील अडचणी दूर करणे आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

औद्योगिक गुंतवणुकीला चालना देणे, नवीन औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती व विद्यमान औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार करणे, भूसंपादनाशी संबंधित प्रश्न मार्गी लावणे तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे, या दृष्टीने बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध जिल्ह्यांतील औद्योगिक विकासाशी संबंधित प्रलंबित विषयांचा विभागनिहाय आढावा घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकारी व यंत्रणांना मार्गदर्शन करण्यात आले. औद्योगिक विकासाला गती देताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि संबंधित घटकांच्या प्रश्नांचाही समन्वयाने विचार करण्यावर भर देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages