कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्थानिक भाषांमधील संवादाच्या माध्यमातून शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे शक्य – जयेश बागडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 27, 2026

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्थानिक भाषांमधील संवादाच्या माध्यमातून शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे शक्य – जयेश बागडे

 

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्थानिक भाषांमधील संवादाच्या माध्यमातून शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे शक्य – जयेश बागडे




मुंबई (कटूसत्य वृत्त):- डिजिटल तंत्रज्ञानामुळे भौगोलिक सीमा ओलांडून शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे. मात्र, ग्रामीण भागातील डिजिटल साक्षरतेचा अभाव, भाषेच्या अडचणी आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी यांसारखे अडथळे दूर करण्यासाठी नागरिकांना परिचित असलेल्या व्हॉट्सॲपसारख्या माध्यमातून शासकीय सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्थानिक भाषांमधील संवादाच्या माध्यमातून देशातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहोचवणे शक्य असल्याची माहिती पिनॅकल टेलिसर्व्हिसेस प्रा. लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष जयेश बागडे यांनी दिली.

माहिती व जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने (होस्ट पार्टनर) हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल, परळ येथे आयोजित ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये ‘इन्क्लुझिव्ह बाय डिझाईन – बिल्डिंग एआय दॅट रिचेस इंडियाज लास्ट माईल’ या विषयावरील सादरीकरणात ते बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.श्री.बागडे म्हणाले की, केंद्र शासनाच्या जनधन, प्रधानमंत्री किसान विमा योजना यांसारख्या विविध योजनांमधून डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना जोडण्यात आले आहे. मात्र, शासकीय पोर्टल आणि ॲप्लिकेशन्स उपलब्ध असूनही ग्रामीण भागातील नागरिकांना भाषेच्या अडचणी आणि डिजिटल साक्षरतेअभावी त्यांचा पुरेपूर लाभ घेता येत नाही. त्यामुळे नागरिक ज्या माध्यमाचा दैनंदिन वापर करतात, त्याच माध्यमातून शासकीय सेवा उपलब्ध करून देणे हा प्रभावी पर्याय आहे.

व्हॉट्सॲप हे सर्व वयोगटांतील आणि विविध शैक्षणिक व भौगोलिक पार्श्वभूमीच्या नागरिकांना परिचित असलेले माध्यम आहे. त्यावर स्थानिक भाषेत संदेश पाठविणे, व्हॉइस नोटद्वारे माहिती देणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने संवाद साधणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात न जाता घरबसल्या विविध शासकीय सेवा मिळू शकतात. यासंदर्भात त्यांनी ग्रेटर चेन्नई महानगरपालिकेचे उदाहरण दिले. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मालमत्ता कर, जन्म-मृत्यू दाखले, विवाह प्रमाणपत्र आणि इतर अशा ४५ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील १२ महिन्यांत या माध्यमातून कर व सेवा शुल्काच्या स्वरूपात सुमारे १०० कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. नागरिकांना व्हॉट्सॲपवर स्थानिक भाषेत संदेश किंवा व्हॉइस नोट पाठवून सेवांची माहिती घेणे आणि आवश्यक शुल्क भरणे शक्य झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) जनजागृती मोहिमेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी मेटाकडून प्रति सेकंद १० हजार संदेश पाठविण्याची विशेष क्षमता मंजूर करून घेण्यात आली. विविध भारतीय भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे हे प्रभावी उदाहरण आहे. राज्य शासनांच्या विविध विभागांमार्फतही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुमारे १२०० सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. व्हॉट्सॲप कॉल, व्हॉइस एआय एजंट, एसएमएस, आरसीएस आणि ई-मेल अशा विविध संवाद माध्यमांना एकाच प्रणालीशी जोडून सेवा अधिक सुलभ आणि परिणामकारक करता येतात.

देशातील प्रत्येक नागरिकाला, विशेषतः शेवटच्या घटकातील व्यक्तीलाही डिजिटल सेवांचा लाभ सहज घेता यावा, या उद्देशाने तंत्रज्ञानाची रचना केली पाहिजे. सर्वसमावेशकता ही डिजिटल परिवर्तनाच्या केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे, असेही जयेश बागडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages