शेतीमाल लिलाव प्रक्रियेची जिल्हा उपनिबंधकांकडून अचानक पाहणी!
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमालाच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आहे का? शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळतो का? व्यापारी आणि अडत्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? या बाबींची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी बाजार समितीला अचानक भेट देत लिलाव प्रक्रियेची पाहणी केली.
या भेटीदरम्यान जिल्हा उपनिबंधक पवार यांनी बाजार समितीतील फळे-भाजीपाला तसेच कांदा विभागाला भेट दिली. यावेळी सुरू असलेल्या लिलाव प्रक्रियेचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. शेतमालाची आवक, लिलावाची पद्धत, खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी यांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
विशेष म्हणजे, केवळ कार्यालयीन कागदपत्रांवर अवलंबून न राहता त्यांनी प्रत्यक्ष बाजारपेठेत जाऊन व्यापारी, अडते आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, सूचना आणि व्यवहारातील समस्या जाणून घेतल्या. बाजार समितीतील व्यवहार अधिक पारदर्शक व सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
उपस्थितांनी मांडलेल्या समस्यांवर योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिले. दरम्यान, कांदा लिलाव प्रक्रियेची पाहणी केल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा उपनिबंधकांनी अचानक बाजार समितीला भेट देऊन प्रत्यक्ष व्यवहारांची माहिती घेतल्याने बाजार समितीच्या आवारात या पाहणीची चर्चा रंगली.

No comments:
Post a Comment