एमआयडीसी पोलिसांचा धडाका; घरफोडीसह दुचाकी चोरीचे आठ गुन्हे उघडकीस - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 28, 2026

एमआयडीसी पोलिसांचा धडाका; घरफोडीसह दुचाकी चोरीचे आठ गुन्हे उघडकीस

 एमआयडीसी पोलिसांचा धडाका; घरफोडीसह दुचाकी चोरीचे आठ गुन्हे उघडकीस





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर घरफोडीचा एक आणि मोटारसायकल चोरीचे सात असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सुमारे ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, एका विधीसंघर्षित बालकासह दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

१४ नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक अरबाज शेख यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना अक्कलकोट रोडवरील बीएसएनएल टॉवरच्या पाठीमागील मैदानात चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी आणली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मोटारसायकल चोरीची कबुली मिळाली. तसेच त्याने या गुन्ह्यात सहभागी असलेल्या साथीदाराची माहिती दिली.

पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरवत संबंधित विधीसंघर्षित बालकाचा सहभाग उघड केला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी, जोडभावी पेठ आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत चोरीच्या सात मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी याच गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे घरफोडीच्या गुन्ह्याचाही छडा लावला. नागोजी बाबा पठाण आणि सुहास अर्जुन दाना यांच्या घरातून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणातही विधीसंघर्षित बालकासह दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईची माहिती पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी नागरिकांना वाहनांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले. दुचाकीच्या चावीचे कुलूप खराब असल्यास ते तातडीने बदलून घ्यावे, शक्य असल्यास वाहनाला जीपीएस यंत्रणा बसवावी आणि दुचाकी नेहमी सुरक्षित ठिकाणी उभी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद देवकर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन यादव, पोलीस उपनिरीक्षक अरबाज शेख आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages