दत्तकला शिक्षण संस्थेत डीबीएटीयू पुणे झोन आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 2, 2026

दत्तकला शिक्षण संस्थेत डीबीएटीयू पुणे झोन आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

 दत्तकला शिक्षण संस्थेत डीबीएटीयू पुणे झोन आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

विविध महाविद्यालयांतील खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग; धावणे, उडी व थ्रो प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवले कौशल्य





स्वामी-चिंचोली (भिगवण) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या डीबीएटीयू पुणे झोन आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा २०२६-२७ या दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च, स्वामी-चिंचोली (भिगवण) येथे बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडल्या.


या स्पर्धेमध्ये पुणे विभागातील डीबीएटीयूशी संलग्न विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. धावणे, उडी आणि थ्रो अशा विविध मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी आपले कौशल्य, शारीरिक क्षमता, जिद्द आणि खिलाडूवृत्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.


या स्पर्धेचे उद्घाटन दत्तकला शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन सदस्या जयमाला बांदल आणि डीबीएटीयू पुणे झोनचे क्रीडा समन्वयक तथा सचिव एच. पी. नरसुदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये क्रीडाक्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.


याप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कुमार व डॉ. ज्योती जवळे तसेच दत्तकला स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सिंधू यादव उपस्थित होत्या.


स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभागाचे प्रमुख ललित लोखंडे आणि सौरभ बोराटे यांनी विशेष समन्वय साधला. महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन आणि इंग्लिश मीडियम स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या पात्र पंचांनी स्पर्धेचे निष्पक्ष आणि शिस्तबद्ध पद्धतीने संचालन केले.


स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आयोजन समिती आणि सहायक कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी सहभागी खेळाडूंचे कौतुक करून विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देण्याची दत्तकला शिक्षण संस्थेची परंपरा या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातून पुन्हा अधोरेखित झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages