विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 17, 2026

विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेश

 

विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेश

महागड्या तपासणीचा कॅन्सर रुग्णावरील आर्थिक भार कमी होणार

६३ उपचारांचा ‘अतिरिक्त निदान प्रक्रिया’ म्हणून योजनेत समावेश

13 प्रकारच्या कर्करोग उपचारांना ‘स्वतंत्र निदान प्रक्रिया’ म्हणून मान्यता



मुंबई,  (कटूसत्य वृत्त):- कर्करोगाचे अचूक निदान,  आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली PET-CT स्कॅन ही महागडी तपासणी आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच निवडक 13 प्रकारच्या कर्करोगांसाठी पीईटी-सीटीचा स्वतंत्र अथवा नियमित प्राथमिक निदान प्रक्रिया म्हणून समावेश केला आहे. या निर्णयामुळे कॅन्सर रुग्णांना स्वतःच्या खिशातून महागड्या तपासणीसाठी खर्च करण्याचा भार कमी होणार आहॆ.

सार्वजनिक आरोग्य विभागाने त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, शासन निर्णयानुसार, 63 कर्करोग उपचारांचा पॅकेजमध्ये PET-CT तपासणीचा ‘अतिरिक्त निदान प्रक्रिया’ म्हणून समावेश केला आहॆ. तसेच 13 प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी ‘स्वतंत्र निदान प्रक्रिया’ म्हणून या तपासणीला मान्यता देण्यात आली आहे.

महागड्या तपासणी खर्चामुळे अनेकदा रुग्ण PET-CT तपासणी पुढे ढकलत किंवा तपासणी टाळत असत. परिणामी आजाराचे स्वरूप समजण्यास आणि योग्यवेळी उपचारांचे नियोजन करण्यास विलंब होतो. ही अडचण लक्षात घेऊन PET-CT तपासणीचा योजनेत समावेश करण्याची मागणी नागरिक व संलग्न रुग्णालयांकडून होत होती. या मागणीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्करोगावरील उपचार अधिक  सुलभ, योग्य वेळी होतील. तसेच रुग्णांना महागड्या तपासणीसाठी  खर्च करण्याचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कर्करोग उपचारांशी संबंधित 63 उपचार पॅकेजमध्ये PET-CT स्कॅनचा अतिरिक्त निदान प्रक्रिया (Add-on Diagnostic Procedure) म्हणून समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 44 उपचार पॅकेजमध्ये ही सुविधा समाविष्ट होती. नव्या निर्णयामुळे अशा अतिरिक्त पॅकेजची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे  उपचारांसाठी आवश्यक असलेल्या निदान प्रक्रियेची उपलब्धता अधिक व्यापक होण्यास मदत होईल. याशिवाय, वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्तता निश्चित झालेल्या निवडक 13 प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी PET-CT स्कॅन स्वतंत्र किंवा नियमित निदान प्रक्रिया (Regular/Primary Procedure) म्हणून समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. PET-CT तपासणीसाठी संपूर्ण शरीर (Whole Body) ₹२०,४००, मेंदू (Brain) ₹१४,६५०, गॅलियम-६८ (Gallium 68) ₹१५,०००, हृदय (Cardiac) ₹९,४०० हा दर निर्धारित केलेले असून रुग्णालयांनी शासन निर्णयात नमूद केलेल्या अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहणार आहे.

PET-CT तपासणीसाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणीची वैद्यकीय आवश्यकता प्रमाणित करणे बंधनकारक आहे. तसेच, संबंधित अंगीकृत रुग्णालयात आवश्यक तांत्रिक सुविधा, उपकरणे, पात्र मनुष्यबळ आणि स्वतःचे PET-CT केंद्र (In-house PET-CT Centre) असणे आवश्यक आहे. तपासणीपूर्वी पूर्वमान्यता घेणे आणि आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे सादर करणेही बंधनकारक राहणार आहे. निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीला राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या TMS 2.0 प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश  देण्यात आले आहेत

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना PET-CT सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे  कर्करोगाच्या रुग्णांना अचूक व  योग्य टप्प्यावर निदान होण्याबरोबरच उपचारांचे योग्यवेळी नियोजन होण्यास मदत होईल. या  तपासणीचा विस्तारीत महात्मा फुले व जन आरोग्य योजनेत समावेश करने हा राज्य शासनाच्या कॅन्सर विरोधी लढ्यातील  महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहॆ.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages