"अर्ध्या रात्री मदतीला येणाऱ्या उमेदवाराला मत द्या"
दत्तात्रय सावंत यांच्या प्रचार पत्रकाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरत असून, उमेदवारांच्या प्रचाराला प्रचंड वेग आला आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी आमदार आणि शिक्षकांचे लोकप्रिय नेते दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या एका प्रचार पोस्टरने सध्या सोशल मीडिया आणि शिक्षक वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पोस्टरवर अत्यंत मार्मिक आणि मतदारांना विचार करायला लावणारा संदेश देण्यात आला आहे.
पोस्टरमधील महत्त्वाचा संदेश:
प्रसिद्ध झालेल्या पोस्टरवर "चला चला दिवाळी आली, सावंत सरांना शिक्षक आमदार बनवायची वेळ आली!" अशी मुख्य टॅगलाईन देण्यात आली आहे. यासोबतच, सद्यस्थितीतील राजकीय आणि निवडणूक संस्कृतीवर बोट ठेवत, "अर्ध्या रात्री पैसे देणाऱ्यांना नाही, तर अर्ध्या रात्री मदतीला येणाऱ्या उमेदवाराला मत द्या..!" असे जाहीर आवाहन शिक्षकांना करण्यात आले आहे.
शिक्षकांच्या हक्काचा बुलंद आवाज:
दत्तात्रय सावंत सर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण चळवळीत सक्रिय असून त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर, जुनी पेन्शन योजना (OPS) आणि अशैक्षणिक कामांच्या विरोधात सातत्याने लढा दिला आहे. "शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकच आमदार असायला हवा," अशी भावना मतदारसंघातून व्यक्त होत आहे.
निवडणुकीत चौरंगी लढत, सावंत सरांचा विजयाचा दावा:
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, "मतदारसंघातील ६२ हजार मतदारांपैकी तब्बल २५ हजारांहून अधिक शिक्षक थेट आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, पहिल्याच फेरीत आपला विजय निश्चित आहे," असा ठाम विश्वास सावंत सरांनी व्यक्त केला आहे.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सावंत सरांच्या समर्थकांकडून हा प्रचार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून, "अर्ध्या रात्री मदतीला धावून जाणारा हक्काचा आमदार" म्हणून शिक्षकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

No comments:
Post a Comment