‘निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा एल्गार!
लोकशाहीच्या रणांगणात राहुल गांधी; ‘मतचोरी’विरोधातील आंदोलनानंतर ताब्यात!
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून केंद्र सरकार तसेच निवडणूक आयोगाविरोधातील विरोधकांचा संताप मंगळवारी राजधानी दिल्लीत उफाळून आला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासह इंडिया आघाडीतील नेत्यांनी आकाशवाणी भवनाबाहेर तब्बल नऊ तास ठिय्या आंदोलन करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भेटीची मागणी लावून धरली. अखेर रात्री दिल्ली पोलिसांनी कारवाई करत राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांना ताब्यात घेतले. प्रियांका गांधी यांना काही वेळाने सोडण्यात आले; मात्र राहुल गांधी यांना पोलिसांच्या बसमधून नेण्यात आल्याने आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला.
मंगळवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासून राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेससह विरोधी पक्षांचे अनेक नेते आकाशवाणी भवन परिसरात ठाण मांडून बसले होते. आकाशवाणी भवन हे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या अगदी जवळ असल्याने आंदोलनाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले. ‘मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटल्याशिवाय येथून हटणार नाही,’ अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली.
निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारले होते. मागील गेटकडील रस्ताही बंद करण्यात आला होता. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विरोधकांनी बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी केली. वातावरण तापल्यानंतर काही नेते आणि कार्यकर्ते आकाशवाणी भवनाच्या आवारात शिरले.
‘लोकशाही वाचवण्यासाठी लढतोय’
आंदोलनस्थळावरून पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. ‘भाजप काय म्हणते, यामध्ये मला रस नाही. आम्ही केवळ भाजपला विरोध करत नाही; देशातील लोकशाही वाचवण्यासाठी उभे आहोत,’ असे गांधी यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. तरुणांना ‘मतचोरी’चा प्रकार समजला असून निवडणुका हायजॅक केल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या या आरोपांवर भाजप किंवा निवडणूक आयोगाची अधिकृत भूमिका या आंदोलनाच्या वेळी समोर आलेली नव्हती.
अखिलेश यादवांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी ‘मतचोरी’चे आरोप केले. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेबाबतही त्यांनी गंभीर आरोप केले.
विरोधकांचा आरोप आहे की, मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेमुळे लोकशाहीच्या मूलभूत प्रक्रियेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. या आरोपांवर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरणाची मागणी विरोधकांनी केली आहे.
बॅरिकेड्सवर चढले नेते; पोलिसांची कारवाई
सकाळपासूनच विरोधी पक्षांचे नेते आणि खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी आकाशवाणी भवनाजवळच त्यांना अडवले. त्यामुळे नेते आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी केली.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांच्यासह अनेक कार्यकर्ते रात्रीपर्यंत आंदोलनस्थळी उपस्थित होते. अखेर रात्री पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी, कल्याण बॅनर्जी, डेरेक ओ’ब्रायन, इम्रान मसूद, पी. संतोष, ए. रहीम यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना विविध पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आले.
राहुल गांधींना बसमधून नेले; ‘सर्व काही लक्षात ठेवले जाईल’
राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर बसमधून घेऊन जातानाचा व्हिडीओ काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रसिद्ध केला. या व्हिडीओसोबत काँग्रेसने ‘सर्व काही लक्षात ठेवले जाईल’ असा इशारा देणारे कॅप्शन दिले.
राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनस्थळी काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाभोवती सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली.
विरोधकांचा लढा आता दिल्लीच्या रस्त्यावर
एसआयआर आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा आता संसद आणि राजकीय व्यासपीठापुरता मर्यादित न राहता थेट दिल्लीच्या रस्त्यावर पोहोचला आहे. विरोधकांनी निवडणूक आयोगाकडून उत्तर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे इंडिया आघाडीतील विविध पक्ष पुन्हा एका व्यासपीठावर आल्याचेही चित्र दिसले. निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीची मागणी केल्याने केंद्राच्या राजकीय वर्तुळातही या आंदोलनाची चर्चा रंगली आहे.

No comments:
Post a Comment