वेतनातील अन्यायाविरोधात मुख्याध्यापिका अत्तार यांचे आंदोलन
शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास स्थगित
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मजरेवाडी परिसरातील भारत उर्दू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शाहीन अत्तार यांनी प्रशासकीय छळवणूक आणि वेतनातील अन्यायाविरोधात जाहीर केलेले सोमवारचे मुंडन व उपोषण आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या महत्त्वपूर्ण मध्यस्थीनंतर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी मागण्यांची दखल घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
मुख्याध्यापिका शाहीन अत्तार या संबंधित संस्थेमध्ये मागील २२ वर्षांपासून कायम मुख्याध्यापिका, तर ५ वर्षे प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून सेवा बजावत आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या सेवाविषयक बाबींमध्ये गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. नियमानुसार वार्षिक वेतनवाढ व प्रलंबित वेतन मिळणे, तसेच शालार्थ प्रणालीतील कथित कारवाईमुळे प्रलंबित राहिलेले वेतन मंजूर करणे या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. ५ ऑक्टोबरपर्यंत मागण्यांवर लेखी व ठोस कारवाई न झाल्यास सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर प्रतीकात्मक मुंडन आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात दिला होता.
या इशाऱ्याची प्रशासनाने तातडीने दखल घेतली. या संपूर्ण लढ्यात कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी मुख्याध्यापिका अत्तार यांना भक्कम पाठबळ दिले. त्यांनी या प्रकरणी शिक्षण प्रशासनाकडे पाठपुरावा करून सकारात्मक मध्यस्थी केली.
आमदार म्हात्रे व माजी आमदार सावंत यांच्या मदतीमुळे आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापिका अत्तार यांच्या प्रलंबित मागण्यांवर कायदेशीर व योग्य ती सकारात्मक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाकडून मिळालेल्या या लेखी खात्रीनंतर, अत्तार यांनी आपले नियोजित मुंडन आणि उपोषण आंदोलन तूर्तास स्थगित करत असल्याचे जाहीर केले. मागण्यांची वेळेत पूर्तता न झाल्यास पुढील पाऊल उचलण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष मुरलीधर कडलास्कर यावेळी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment