राणा सूर्यवंशीनेच नारायण पवारांच्या संगनमताने स्वतःवर हल्ला घडवून आणला का ? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 28, 2026

राणा सूर्यवंशीनेच नारायण पवारांच्या संगनमताने स्वतःवर हल्ला घडवून आणला का ?

 राणा सूर्यवंशीनेच नारायण पवारांच्या संगनमताने स्वतःवर हल्ला घडवून आणला का ?

आमदार रोहित पवारांचा खळबळजनक सवाल; राणाची सुरक्षा काढून घेण्याची मागणी



बारामती / पुणे (कटूसत्य वृत्त):- स्वयंघोषित उद्योजक राणा सूर्यवंशी याच्यावरील कथित हल्ला प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून, या प्रकरणावरून राज्यात वातावरण तापले आहे. राणा सूर्यवंशी याने पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या संगनमताने स्वतःवरच हल्ला घडवून आणला होता का? असा गंभीर सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणातील संशयित बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

‘स्वतःवर हल्ला घडवून आणणाऱ्यांची सरकारी सुरक्षा काढा!’

माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी राणा सूर्यवंशी याच्या सुरक्षेवरून सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा संशय असलेल्या व्यक्तीला जनतेच्या पैशातून सरकारी सुरक्षा कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा व्यक्तीची सरकारी सुरक्षा काढून घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

राणा सूर्यवंशी हा बारामतीत येऊन स्वतःवरच हल्ला घडवून आणतो, असा संशय व्यक्त करताना या प्रकरणात आणखी खोलात जाऊन तपास केल्यास अनेकांची नावे समोर येऊ शकतात, असेही रोहित पवार म्हणाले. मात्र, या आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

रुग्णालयातून पसार होण्यावरही प्रश्नचिन्ह

कथित हल्ल्यानंतर राणा सूर्यवंशी याला पुण्यातील स्वतः संचालक असलेल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, पोलिसांकडून चौकशी होण्यापूर्वीच तो रुग्णालयातून पोलीसांच्या व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन निघून गेल्याच्या वृत्तामुळे प्रकरणातील संशय अधिक गडद झाला आहे. त्याचे काही मित्र असलेले साथीदारही अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला.

बारामतीची बदनामी होत असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी या राणा सुर्यवंशी याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

‘सरकारी सुरक्षेऐवजी खासगी सुरक्षा घ्या!’

राणा सूर्यवंशी स्वतःला उद्योगपती म्हणवून घेत असेल, तर त्याने जनतेच्या पैशातून दिल्या जाणाऱ्या सरकारी सुरक्षेवर अवलंबून न राहता आवश्यक असल्यास खासगी सुरक्षा घ्यावी, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली. सरकारी सुरक्षेचा खर्च जनतेच्या पैशातून होत असल्याने अशा सुरक्षेची गरज आणि तिचा आधार यांची तपासणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सूचित केले.

महासंचालकांनी तपास स्वतःकडे का घेतला?

या प्रकरणाच्या तपासावरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. पुण्याचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांनी तपासाला गती दिली होती; मग पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी तपास स्वतःकडे का घेतला, असा सवाल त्यांनी केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तपासाची जबाबदारी गेल्यानंतर तपासाची गती मंदावल्याचा आरोपही त्यांनी केला.

बारामतीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या कामकाजाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात पोलिसांची भूमिका, तपासातील प्रत्येक टप्पा आणि संशयितांच्या हालचाली यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.

संशयाच्या धुक्यातील प्रकरण; सत्य तपासातूनच समोर येणार!
हल्ल्याचे नेमके स्वरूप काय होते ? हा प्रकार पूर्वनियोजित होता का ? सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी हल्ला घडवून आणला का ? अन्य कोणाला गुंतवण्यासाठी हा हल्ला घडवून आणला होता? तसेच कथित हल्ल्यानंतर संबंधित व्यक्ती रुग्णालयातून कशी निघून गेली? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे. 
राणा सूर्यवंशी याच्यावरील कथित हल्ला, रुग्णालयातून निघून जाण्याचे वृत्त, काही संशयितांचा शोध आणि तपासाच्या नियंत्रणावरून उपस्थित झालेले प्रश्न यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मात्र, स्वतःवर हल्ला घडवून आणल्याचा किंवा पोलीस अधिकाऱ्याशी संगनमत आहे का हे तपासातून सिद्ध होईल. त्यामुळे संबंधित व्यक्तींची भूमिका, उपलब्ध पुरावे आणि पोलिसांचा अधिकृत निष्कर्ष महत्त्वाचा ठरणार आहे.

आता प्रश्न केवळ कथित हल्ल्याचा राहिलेला नाही; तर या प्रकरणामागचे नेमके सत्य काय, तपासात कोणती माहिती समोर येते आणि सरकारी सुरक्षेबाबत सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages