तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 3, 2026

तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण

 तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण






टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- गेल्या तीन दशकांपासून शिंदे विरुद्ध मोहिते-पाटील असा राजकीय संघर्ष सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेचा विषय राहिला आहे. आमदारकीपासून जिल्हा परिषद, डीसीसी बँक, ग्रामपंचायत आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत अनेक ठिकाणी दोन्ही घराणी आमनेसामने उभी राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या निमगाव येथील निवासस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घेतलेल्या भेटीने सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला अक्षरशः उधाण आले आहे. ही भेट केवळ प्रकृतीची विचारपूस करण्यापुरती मर्यादित असली तरी, दशकांपासून परस्परांचे राजकीय विरोधक असलेली दोन बलाढ्य घराणी पुन्हा जवळ येणार का? याबाबत राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

माढा, माळशिरससह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अनेक निवडणुकांमध्ये शिंदे आणि मोहिते-पाटील हे एकमेकांच्या विरोधात राजकीय मैदानात उतरल्याचे चित्र राहिले आहे. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, सहकारी संस्था, डीसीसी बँक आणि विधानसभा-लोकसभा निवडणुकांपर्यंत या दोन घराण्यांच्या राजकीय संघर्षाचे पडसाद उमटले आहेत. अनेकदा पक्षीय समीकरणांपेक्षाही स्थानिक पातळीवरील ‘मोहिते विरुद्ध शिंदे’ हीच राजकीय ओळख अधिक प्रभावी ठरल्याचे पाहायला मिळाले. मात्र, राजकारणातील संघर्ष बाजूला ठेवत विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बबनदादा शिंदे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. बबनदादांनी केलेल्या हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत लवकरात लवकर ते पूर्णपणे बरे व्हावेत, अशा शुभेच्छा मोहिते-पाटील यांनी व्यक्त केल्या. वरकरणी ही सदिच्छा भेट असली तरी तिच्या राजकीय अर्थांवर सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. दोन्ही घराण्यांमध्ये अनेक वर्षांपासून व्यक्तिगत स्नेह आणि ऋणानुबंध असल्याचेही बोलले जाते. राजकीय पातळीवर कितीही मतभेद असले तरी वैयक्तिक नात्यांमध्ये कटुता येऊ न देणे, ही या दोन्ही घराण्यांची परंपरा असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे निमगावातील ही भेट राजकीय संघर्षाच्या पलीकडील नात्याची प्रचिती देणारी ठरली आहे. आगामी काळात माढा लोकसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि शिंदे-मोहिते-पाटील एकाच राजकीय व्यासपीठावर आले तर त्याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, या भेटीला सध्या कोणताही राजकीय निर्णय किंवा युतीचा अधिकृत संकेत मानता येणार नसला तरी, दोन बलाढ्य राजकीय घराण्यांची ही जवळीक भविष्यात कोणते नवे राजकीय समीकरण जन्माला घालते, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राजकीय चौकट | 
तीन दशकांचा संघर्ष... एका भेटीने चर्चेला उधाण!
शिंदे-मोहिते-पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत; मात्र बबनदादांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी झालेल्या भेटीने जुन्या समीकरणांना नव्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages