सेवा संकल्प अभियानातून घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण
पंढरपूर पंचायत समितीचा उपक्रम; गावपातळीवरच प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांचे कॅम्प
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सेवा संकल्प अभियानांतर्गत पंढरपूर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्ये घरकुल लाभार्थी मेळावे व विशेष कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमातून घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे गावपातळीवर तसेच तालुकास्तरावर निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, वाखरी, रोपळे, मुंडेवाडी, वाडी-कुरोली, भाळवणी आदी गावांमध्ये घरकुल लाभार्थी मेळावे व कॅम्प घेण्यात आले. या कॅम्पमध्ये संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष गावात उपस्थित राहून घरकुल लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत. लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये पंचायत विस्तार अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी यांचा सहभाग आहे. विविध विभागांच्या समन्वयातून लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
घरकुल योजनेतील प्रलंबित हप्ते, घरकुलासाठी जागेशी संबंधित अडचणी, घरकुल कामाच्या नोंदी तसेच मस्टर प्रक्रियेसंदर्भातील अडचणी याबाबत लाभार्थ्यांकडून माहिती घेण्यात येत आहे. संबंधित प्रकरणांची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांची प्रलंबित कामे नियमानुसार मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
घरकुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रक्रियांमध्ये लागणारा वेळ कमी करण्यासाठी विभागीय स्तरावर समन्वय साधण्यात येत आहे. गावपातळीवरच लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यावर या उपक्रमात विशेष भर देण्यात आला आहे.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद वाढविणे तसेच प्रलंबित कामांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या अडचणी संबंधित कॅम्पमध्ये मांडून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment