मुंबई उपनगरात २९ सप्टेंबरला १६ ठिकाणी रोजगार महाकुंभाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 24, 2026

मुंबई उपनगरात २९ सप्टेंबरला १६ ठिकाणी रोजगार महाकुंभाचे आयोजन

मुंबई उपनगरात २९ सप्टेंबरला १६ ठिकाणी रोजगार महाकुंभाचे आयोजन




मुंबई(कटूसत्य वृत्त):-  मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २९ सप्टेंबर रोजी १६ विविध ठिकाणी आयोजित केलेल्या रोजगार महाकुंभ मेळाव्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले. या उपक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात तपशीलवार आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कटीयार म्हणाले, रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून नोकरी इच्छुक उमेदवार आणि नियोक्त्यांना एकाच मंचावर आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, विविध उद्योग समूह आणि आस्थापनांना आवश्यक व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देतानाच जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी मिळाव्यात, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना आवश्यक तयारी करून घेण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मोफत मुलाखत कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा ७ ते १० सप्टेंबर आणि दुसरा टप्पा २१ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडला. आता २९ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी

मुंबई उपनगर जिल्ह्यातील १६ ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या या रोजगार मेळाव्यांमध्ये उत्पादन, अभियांत्रिकी, बँकिंग व वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, सेवा तसेच वाहतूक व लॉजिस्टिक्स अशा विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

जोगेश्वरी पूर्व येथील लालजी मेहरोत्रा टेक्निकल इन्स्टिट्यूट, मानखुर्द येथील एआयसीएमईयू खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विलेपार्ले पूर्व येथील नव समाज मंडळ महाविद्यालय, वांद्रे-कुर्ला संकुलातील सॅपिओ अॅनॅलिटिक्स, भांडुप येथील नवजीवन पॉलिटेक्निक, बोरिवली येथील क्वास्टेक व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कांदिवली येथील ठाकर स्पेशलाइज्ड डिग्री कॉलेज, कुर्ला येथील अॅटलस स्किलटेक विद्यापीठ, विद्याविहार येथील के. जे. सोमय्या पॉलिटेक्निक, अंधेरीतील विविध औद्योगिक व व्यावसायिक संस्था, सांताक्रूझ येथील उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वांद्रे येथील चेतना महाविद्यालय तसेच घाटकोपर येथील महिला महाविद्यालय अशा १६ ठिकाणी मेळावे होणार आहेत.

उमेदवार नोंदणीवर भर

रोजगार मेळाव्यात अधिकाधिक युवकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी उमेदवार नोंदणी आणि रोजगार मेळावा मार्गदर्शन यावर विशेष भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. उमेदवारांना उपलब्ध रोजगाराच्या संधी, मुलाखतीची तयारी आणि मेळाव्यात सहभागी होण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या घराजवळ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी रोजगार महाकुंभ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे संबंधित विभाग, शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि सहभागी आस्थापनांनी परस्पर समन्वयातून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

बैठकीस मुंबई उपनगर येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त शैलेश भगत, मुंबई उपनगर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विलास संखे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages