चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 24, 2026

चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे

 चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे

– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील




सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-   जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावे. प्रशिक्षणात देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रक्रियेची अचूक माहिती समजून घेतल्यास पुढील टप्प्यातील कामकाजात अडचणी येणार नाहीत आणि जनगणनेचे काम अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येईल, असे प्रतिपादन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले.
जिल्हा नियोजन कार्यालयातील सभागृहात जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन २३ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जनगणना कार्य संचालनालय, मुंबईच्या सहायक संचालक तेजल कटारे, सांख्यिकी अधिकारी तुषार पाटील, तहसीलदार सीमा पटणे, नायब तहसीलदार नीलिमा मते, सर्व चार्ज अधिकारी तथा तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी, महानगरपालिका क्षेत्रातील चार्ज अधिकारी तसेच जनगणना कर्मचारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील म्हणाले की, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांची यादी व घरगणना प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असून, येत्या फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेस सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक पूर्वतयारी म्हणून इन्युमरेशन ब्लॉकची निर्मिती व संक्षिप्त गृहसूची तयार करण्याच्या अनुषंगाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील टप्प्यातील अनुभव लक्षात घेता, पुढील टप्प्यातही सोलापूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अग्रस्थानी यावे, यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सहायक संचालक तेजल कटारे यांनी सांगितले की, जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजात अचूकता आणि काटेकोरपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या इन्युमरेशन ब्लॉकमध्ये लोकसंख्या ८०० पेक्षा अधिक आहे, अशा ब्लॉकची आवश्यकतेनुसार पुनर्रचना (रिसेटिंग) करण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी. यासाठी उपलब्ध पीपीटी, परिपत्रके तसेच जनगणना कार्य संचालनालयाने तयार केलेल्या प्रशिक्षणपर व्हिडिओचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपयोग करावा.
दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र माहिती संकलित करण्यात येणार असून, त्यासाठी ४० प्रश्नांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रगणकांकडून माहिती संकलनाची प्रक्रिया अचूकपणे होण्यासाठी चार्ज अधिकाऱ्यांनी संपूर्ण कामकाजावर प्रभावी नियंत्रण व देखरेख ठेवणे आवश्यक आहे. जनगणनेची माहिती गोपनीय असून, ती माहिती कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला देऊ नये. पहिल्या टप्प्यातील कामकाजातील अनुभव व त्रुटी लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यातील कामकाज वेळेत व अचूकपणे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सांख्यिकी अधिकारी तुषार पाटील यांनी प्रगणक तयार करण्याची सर्वसाधारण तत्त्वे, प्रगणक गट तयार करण्याची पद्धत, मांडणी दर्शक नकाशाचे पुनरावलोकन, गणना घराची निवड व वाटप, संक्षिप्त गृहसूची तसेच इन्युमरेशन ब्लॉकची अचूक निर्मिती व नोंदणी करण्याच्या पद्धतीबाबत पीपीटी तसेच CMMS पोर्टलच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages