नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आरक्षित जागेवर केले अतिक्रमण?
महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण केल्याच्या आरोपांसह मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात सोलापूर महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी महानगरपालिका प्रशासन तसेच प्रभाग क्रमांक १५-अ मधील नगरसेविका सौ. श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.
आंदोलनासाठी आणण्यात आलेल्या बॅनरवर नगरसेविका सौ. श्रीदेवी जॉन फुलारे यांची प्रतिमा वापरण्यात आली होती. या प्रतिमेच्या वापरावर पोलिसांनी आक्षेप घेतल्याने आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी आंदोलक निलेश संगेपाग यांनी पोलिसांशी संवाद साधत आंदोलन थांबवू नये, अशी विनंती केली. आंदोलनाचा उद्देश आरक्षित जागेवरील अतिक्रमणाच्या आरोपांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे हा असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांना हात जोडून आंदोलन सुरू ठेवण्याची विनंती केली. परिस्थिती शांत करण्यासाठी त्यांनी पोलिसांसमोर लोटांगण घालतही आपली मागणी मांडली. त्यानंतर आंदोलकांनी शांततेत आपले आंदोलन सुरू ठेवले.
दरम्यान, शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमणाच्या आरोपांची सखोल चौकशी करावी, संबंधित जागेची अधिकृत मोजणी करावी, आणि नियमानुसार कारवाई करावी तसेच या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.
आंदोलनादरम्यान “आरक्षित जागा वाचलीच पाहिजे”, “अतिक्रमण हटलेच पाहिजे”, “चौकशी झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांच्या हक्काच्या आणि शाळेसाठी राखीव जागेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात *निलेश संगेपाग, चंद्रकांत यमगर, राजू अलकोड, रवी नाईक, भगवान करगुळे, मल्लिकार्जुन पिलगेरी, श्रीकांत वाघमारे, सुमित भंडारे, सिदलिंग पल्ले, यश शिवशरण,नारायण माने, विनोद झळके, प्रथमेश गिरजकर, अनवर शेख यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी आंदोलकांनी आपली भूमिका मांडत शांततेत आंदोलन पूर्ण केले. आणि महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आरक्षित जागेवरील अतिक्रमणाच्या आरोपांबाबत प्रशासनाने पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
.png)
No comments:
Post a Comment