बसवेश्वर विचार मंचचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 31, 2026

बसवेश्वर विचार मंचचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

 बसवेश्वर विचार मंचचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर




शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळांचाही होणार गौरव; ५ सप्टेंबरला पुरस्कार वितरण

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने बसवेश्वर विचार मंचच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपक्रमशील शाळा पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आले आहेत. मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी पुरस्कारार्थींची नावे जाहीर केली.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बलिदान चौक येथील जैन स्थानकात परमपूज्य अक्षयश्रीजी महाराज यांच्या दिव्य सानिध्यात पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. इंडियन मॉडेल स्कूलच्या सौ. सायली जोशी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून स्थायी समिती सभापती सौ. रंजिता चाकोते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

या कार्यक्रमास दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक तथा माजी प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे, नगरसेवक अनंत जाधव, राजू भुमकर, बाळासाहेब वाघमारे, चंद्रकांत वानकर, डॉ. संध्या रघोजी, राजशेखर हिरेहब्बू आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी

बसवेश्वर विचार मंचच्या वतीने यंदा विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रा. प्रशांत शिंपी (संगमेश्वर कॉलेज), सौ. संगीता पाटील (एस.व्ही.सी.एस. हायस्कूल, भवानी पेठ), सौ. लता सूर्यवंशी-कांबळे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारंबा), संतोषी जाधव (सहस्त्रार्जुन प्रशाला), पल्लवी दोड्डी (श्रीमती लक्ष्मीबाई मिठ्ठा बालक मंदिर), सौ. पुनम कटकधोंड (सेंट जोसेफ हायस्कूल), सौ. योगिता पवार (दमाणी प्राथमिक विद्यामंदिर), सुजाता खेडगीकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोडातांडा) यांचा समावेश आहे.

तसेच सौ. गौरी देशमुखे-उपासे (अधीक्षक, रिमांड होम), बाबागौडा बिराजदार (एस.के. बिराजदार प्रशाला), उमेश युवनाती (महानगरपालिका शाळा, देशमुख वस्ती, देगाव), कृष्णकांत उपाध्ये (श्री सिद्धेश्वर बाल मंदिर माध्यमिक शाळा), विरेश थळंगे (शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, वळसंग), सुषमा वाघमोडे (श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळा, कुंभारी), भाऊसाहेब भोसले (कै. सौ. शोभाताई दिलीपराव सोपल विद्यालय, बार्शी), सौ. शीला हावळे (बलदवा हायस्कूल, देगाव), सौ. व्ही.आर. गवळी (बसवेश्वर मराठी विद्यालय, विडी घरकुल), नौशाद सोफी (शास्त्रीनगर उर्दू प्रायमरी स्कूल), चंद्रकांत आदलिंगे (वि.मो. मेहता प्रशाला), प्रा. प्रसन्न नाझरे (अण्णासाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालय), खाशेराव ढोले (एरिया सेल्स मॅनेजर, नवनीत एज्युकेशन) यांनाही आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सन्मान

शैक्षणिक संस्थांच्या यशामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान असते. त्याची दखल घेत यंदा सलीम पटेल (आसावा प्रशाला) आणि सचिन सोनवणे (दयानंद महाविद्यालय) यांची शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पाच शाळांचा ‘उपक्रमशील शाळा’ पुरस्काराने गौरव

शैक्षणिक उपक्रम, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच शाळांचीही उपक्रमशील शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये लोकमंगल माध्यमिक प्रशाला, अवंती नगर; श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला; गांधीनाथा रंगजी मराठी प्राथमिक विभाग, बाळीवेस; श्री वीर तपस्वी बालक मंदिर मराठी प्राथमिक शाळा, भवानी पेठ आणि चांदतारा उर्दू प्रायमरी स्कूल यांचा समावेश आहे.

शिक्षण क्षेत्रात विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा या पुरस्कार सोहळ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे मंचच्या वतीने सांगण्यात आले. पुरस्कार सोहळ्यास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बसवेश्वर विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages