अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव
अकलूज शाखेच्या वतीने सन २०१४ ते २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या विविध नाट्यविषयक उपक्रमांची, सांस्कृतिक कार्यक्रमांची तसेच स्थानिक कलाकार व रंगकर्मींना उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाची माहिती मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. गेल्या बारा वर्षांच्या कालखंडात अकलूज शाखेने नाट्य क्षेत्राशी असलेली आपली नाळ कायम ठेवत विविध उपक्रमांच्या माध्यमातून नाट्य चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. या कार्याची माहिती जाणून घेतल्यानंतर मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांनी अकलूज शाखेच्या कार्याची विशेष दखल घेतली.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष नरेश गडेकर म्हणाले, “महाराष्ट्रातील नाट्य शाखांशी संवाद साधण्यासाठी हा संवाद दौरा आहे. मध्यवर्ती शाखा आणि इतर शाखांचे नाते हे वडील आणि मुलाचे आहे. शाखांना त्यांच्या कार्यात येणाऱ्या अडचणी समजून घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि नाट्य शाखांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक ती मदत करणे, ही मध्यवर्ती शाखेची जबाबदारी आहे. शाखांचा विस्तार करण्यासाठी पाहिजे ती मदत मध्यवर्ती शाखेकडून केली जाईल. ग्रामीण भागातील नाट्य चळवळीला बळ देण्यासाठी स्थानिक शाखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही गडेकर यांनी सांगितले. शहरांपुरती नाट्य चळवळ मर्यादित न राहता तालुका व ग्रामीण भागातील कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि नाट्यप्रेमींना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक शाखांनी सातत्याने उपक्रम राबवावेत आणि मध्यवर्ती शाखेने त्यांना आवश्यक सहकार्य करावे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
कोषाध्यक्ष सतीश लटके यांनीही अकलूज शाखेच्या कार्याची माहिती घेत शाखेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. शाखेने आतापर्यंत केलेल्या कामाबरोबरच आगामी काळात नाट्य क्षेत्रातील नव्या पिढीला जोडण्यासाठी अधिकाधिक उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक कलाकारांना संधी देणे, नाट्य प्रशिक्षण, कार्यशाळा, स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून शाखेचे कार्य अधिक व्यापक करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
या भेटीदरम्यान अकलूज शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अकलूज शाखा अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कार्यकारणी सदस्या सौ.शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेच्या आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती, आगामी उपक्रमांचे नियोजन तसेच नाट्य क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबी मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांनी शाखेच्या अडचणी जाणून घेत भविष्यात आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे अकलूज शाखेतील पदाधिकारी, कलाकार व नाट्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात अकलूज परिसरातील नाट्य चळवळीला आणखी व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी सिनेअभिनेते व उपाध्यक्ष अजय तपकीरे, मुख्य कार्यवाह डॉ.विश्वनाथ आवड, सहकार्यवाह सुनील कांबळे, औदुंबर भिसे, कोषाध्यक्ष अमोल खरात, कार्यकारणी सदस्य शिवदत्त नारायणकर, नितीन बनकर, अनिल जाधव, अमित पुंज, श्रीकांत राऊत, लाला मुजावर, मनोज वर्धम, वैभव आंबेकर यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment