विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी रात्री वीज द्या; महावितरणाकडे औंदुबरराजे भोसले यांचे निवेदन
करमाळा(कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शेतात राहणाऱ्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळेत वीज उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी रात्री वीज सुरू ठेवावी, अशी मागणी करत नेरले येथील मा.सरपंच तथा भाजप करमाळा मंडळ अध्यक्ष श्रीमंत औंदुबरराजे भोसले यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, करमाळा कार्यालयाकडे निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे ९० टक्के कुटुंबे शेतामध्ये वास्तव्यास आहेत. या भागात शेतीसाठी दिला जाणारा थ्री फेज वीजपुरवठा केवळ चार तास, तर काही ठिकाणी सहा तास सुरू असतो. विशेष म्हणजे हा पुरवठा अनेकदा रात्री दहा वाजल्यानंतर सुरू होऊन सकाळी सहा वाजता बंद केला जातो. त्यामुळे शेतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करणे कठीण होत असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्या शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. शासनाकडून मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असताना, दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र वीजअभावी अभ्यासापासून वंचित राहत असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळत नाही. परीक्षांचा काळ, गृहपाठ, स्पर्धा परीक्षा किंवा दैनंदिन शालेय अभ्यास यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांबरोबरच शेतकऱ्यांच्याही अडचणी या प्रश्नाशी जोडलेल्या आहेत. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतातील कामे करावी लागतात. त्याचबरोबर चोरीच्या घटना, वन्यप्राण्यांचा धोका आणि पिकांच्या संरक्षणाचा प्रश्न यामुळे शेतात वीज असणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः रात्री ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वीज उपलब्ध राहणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
महावितरणकडे तांत्रिक अडचणी असतील, तरी त्या कारणास्तव विद्यार्थी आणि शेतकरी अडचणीत येऊ नयेत, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. विभागातील अभियंत्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याचा वापर करून योग्य नियोजन करावे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी तसेच शेतकऱ्यांच्या गरजांसाठी रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी श्रीमंत औंदुबरराजे भोसले यांनी केली आहे.
या निवेदनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून, महावितरण प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment