शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन तीव्र
१८ जुलैला पंढरपुरात शेतकऱ्यांची 'सद्बुद्धी यात्रा'
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने घेतला आहे. आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी १८ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथे भव्य जाहीर सभा आणि त्यानंतर 'सद्बुद्धी यात्रा' काढणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
पंढरपूरजवळील वाकरी मैदानावर १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर वाकरी ते श्री विठ्ठल मंदिर अशी हजारो शेतकऱ्यांची पायी सद्बुद्धी यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे राज्य सरकारने प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा निर्णय घेण्याची सद्बुद्धी मिळावी, अशी सामूहिक प्रार्थना विठ्ठल चरणी करण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३ जिल्ह्यांतील शेतकरी या आंदोलनासाठी एकत्र येणार आहेत.
राजू शेट्टी यांनी आरोप केला की, शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हजारो हेक्टर सुपीक शेती संपादित केली जाणार असून लाखो शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोणतीही आवश्यकता नसताना केवळ कंत्राटदार आणि भांडवलदारांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प राबवला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
यापूर्वी या १३ जिल्ह्यांमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चे, धरणे, आंदोलने, ग्रामसभा तसेच जिल्हा परिषद आणि नगरपालिका स्तरावर ठराव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, सरकारने अद्याप हा प्रकल्प अधिकृतपणे रद्द करण्याची घोषणा केलेली नसल्याने आता आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. १८ जुलै रोजी होणाऱ्या सभेत आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या सद्बुद्धी यात्रेत आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार कैलास पाटील, कॉम्रेड गिरीश फोंडे यांच्यासह विविध पक्षांचे आमदार, खासदार आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनातील पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
हा लढा केवळ जमीन वाचवण्याचा नसून शेतकऱ्यांचे अस्तित्व, संस्कृती आणि रोजगार वाचवण्याचा असल्याचे सांगत शक्तीपीठ महामार्ग बाधित १३ जिल्ह्यांतील शेतकरी, महिला, कष्टकरी आणि तरुणांनी १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वाकरी (पंढरपूर) येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी समन्वय समिती आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने राजू शेट्टी यांनी केले.

No comments:
Post a Comment