बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये ६०.७४ कोटींच्या कथित अपहाराची चौकशी; मेंढी विक्रीतच ४१ कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप
कोल्हापूर (कटूसत्य वृत्त): आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित ६० कोटी ७४ लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारापैकी तब्बल ४१ कोटी रुपयांचा अपहार केवळ मेंढी विक्री व्यवहारातून झाल्याचा आरोप समोर आला आहे. भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून तपासाला वेग आला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की या लेखापरीक्षकांच्या २०५ पानी अहवालाच्या आधारे विविध आर्थिक व्यवहारांची छाननी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मेंढी विक्रीसह महाप्रसाद, देणगी निधी, तसेच ट्रस्टच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्येही कथित गैरव्यवहार झाल्याची शक्यता तपासली जात आहे.
सध्या तपास यंत्रणा संबंधित कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि इतर पुरावे गोळा करत असून, तपासादरम्यान नवीन पुरावे समोर आल्यास गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्षा रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकरी तसेच संबंधित सदस्य आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपासात निष्पन्न होणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
No comments:
Post a Comment