टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ. अभिजीत पाटील आक्रमक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 3, 2026

टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ. अभिजीत पाटील आक्रमक

 टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ. अभिजीत पाटील आक्रमक




मुंबई (कटूसत्य वृत्त):- माढा विधानसभा मतदारसंघातील उच्चदाब वीज प्रसारण (टॉवर) लाईनमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित अडचणी व नुकसानभरपाईच्या प्रश्नांबाबत आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी राज्याच्या ऊर्जा मंत्री मा. श्रीमती मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे.

राज्य विधानसभेच्या अधिवेशनात आमदार अभिजीत पाटील यांनी भोसे, गुरसाळे तसेच मतदारसंघातील विविध गावांतील टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले होते. रेडी रेकनरच्या दुप्पट दराने दिला जाणारा मोबदला प्रत्यक्ष बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच द्राक्षबागांसह कायमस्वरूपी पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन अधिक योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली होती.

यावर उत्तर देताना ऊर्जा मंत्री मा. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन माढा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रकरणे व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सभागृहात आश्वासन दिले होते.

या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी ऊर्जा मंत्र्यांना अधिकृत पत्र पाठवून त्यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हाधिकारी, संबंधित वीज प्रसारण संस्था, महसूल विभागाचे अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तातडीने विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे.

टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई, मोबदल्यातील विसंगती तसेच इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages